देवगड तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अद्यापही 100 टक्के निधी वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उसने पैसे घेऊन घराचे काम पूर्ण केले मात्र शासनाकडून अद्यापही 100 निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देत उर्वरित निधी मिळाला नाही, तर 15 ऑगस्टला पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
देवगड तालुक्यातील पंतप्रधान आवास योजनेच्या 157 लाभार्थ्यांपैकी फक्त 7 ते 8 लाभार्थ्यांनाच 100 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. परंतु त्यातील काही लाभार्थांचे घरकुल पूर्ण होऊनही निधीची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी शुक्रवारी (02 जुलै) गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांची भेट घेतली. यावेळी लाभार्थ्यांनी, निधीची तरतुद नसेल तर अशा फसव्या योजना जाहीर का करता? गरीबांना मोफत घरे देतो अशी चमकेगीरी करून निवडणुकीच्या तोंडावर मते मिळविण्याचा हा एककलमी कार्यक्रम आहे का? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला. निधी मिळेल या आशेवर असलेल्या लाभार्थ्यांनी उसने पैसै घेऊन घरांची कामे पूर्ण केली. मात्र आता निधी मिळत नसल्यामुळे लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. “राज्यशासनाकडून निधी आला नसल्यामुळे लाभार्थ्यांना निधी वितरीत करण्यात आला नाही. निधी प्राप्त होताच देण्यात येईल.” असे गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी सांगीतले.
या योजनेत लाभार्थ्यांची फसवणूक झाली असून उर्वरीत निधीची पुर्तता न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. याबाबत 26 लाभार्थ्यांनी सह्यांचे निवेदन गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांना दिले. यावेळी दत्ताराम उर्फ बाळा कोयंडे, सिताराम कोयंडे, रामचंद्र त्रिबंककर, भाऊ चिंदरकर, विजया बापर्डेकर, नंदकिशोर खोत, शिवराम जोशी, निळकंठ खोत, किरण हिंदळेकर, विशाखा मयेकर, अभय पराडकर आदी लाभार्थी उपस्थित होते.