BSNL 5G च्या चाचणीला सुरुवात, Jio आणि Airtel ला मिळणार तगडं आव्हान

जिओ, एअरटेल, व्हीआयसारख्या मोठ्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनमध्ये 35 टक्क्यांची वाढ करून ग्राहकांना धक्का दिला. मात्र बीएसएनएलने कोणतीही दरवाढ केली नाही. विशेष म्हणजे बीएसएनएलचे टॅरिफ प्लॅन इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळेच बीएसएनएलने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी आता 5G सर्व्हिस ची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे.

Jio, Airtel आणि VI ने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांनी BSNL ला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. ताज्या रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये BSNL च्या ग्राहकांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. अशातच BSNL ने एक पाऊल पुढे टाकत 5G सर्व्हिसची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी कंपनी अद्याप आपली 4G सेवा पूर्णपणे आमलात आणू शकलेली नाही. बीएसएनलची सेवा स्वस्त असली, तरी यासाठी ग्राहकांना अनेक तडजोडी कराव्या लागतात. तसेच जिओ आणि व्हीआय सारख्या कंपन्यांनी 5G सर्व्हिसचा देशभरात विस्तार केला आहे. त्यामुळे बएसएनलने लवकरात लवकर 4G आणि 5G सेवेचा विस्तार देशभरात करावा अशी ग्राहकांना अपेक्षा आहे.