अभिव्यक्ती – … तुजी औकात काये?

>> डॉ. मुकुंद कुळे

वेदिका कुमारस्वामी यांच्या बाईपणाच्या भोगाविषयीच्या कविता ‘गावनवरी’ या पुस्तकात दिवंगत लेखिका-कवयित्री कविता महाजन यांनी संकलित अन् संपादित केल्या आहेत. या कवितासंग्रहावर आधारित ‘तुजी औकात काये?’ हे संगीत नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे. कथन, गायनाच्या माध्यमातून वेदिकाच्या कविता सादर करत स्त्री मनाची-स्त्री देहाची जाणीव व्यापक करणारा असा हा प्रयोग आहे.

‘वेदिका कुमारस्वामी या गावनवरीला, देवदासी परंपरेमुळे जिला शरीरविक्रयाचा व्यवसाय करावा लागतोय तिला तिचा हेगडेशेठ ‘रांडे, तुजी औकात काये?’ असा प्रश्न विचारतो. त्याचा हा प्रश्न ऐकल्यावर वेदिकेला आठवतं की- ‘अरेच्चा माझ्या आजीलाही तिच्या नवऱयाने हाच प्रश्न विचारला होता आणि माझ्या अम्मालादेखील मंदिराच्या पुजाऱयाने हाच सवाल टाकला होता…‘पण हेगडे काय, लग्नाचा नवरा काय, मंदिराचा पुजारी काय किंवा एकूणच पारंपरिक समाजपुरुष काय, तो स्त्रीकडे एक उपभोग्य वस्तू म्हणूनच पाहात असतो. त्याच्या लेखी कोणत्याही स्त्रीची किंमत नगण्य असते. जणू तो असतो एक मोकळा सांड आणि म्हणूनच एकूण स्त्राrजातीला त्याचा प्रश्न असतो- ‘…, तुजी औकात काये?’

मुळात गंमत ही असते की, पुरुषालाच बाईची खरी औकात ठाऊक नसते. मनात आणलं तर बाई काय करू शकते ते भल्याभल्या पुरुषांना उमगत नाही. म्हणून तर वेदिकासारख्या स्त्रिया आपली औकात सांगण्याच्या भानगडीत पडत नाहीत. कारण हेगडेसारखी माणसं आपल्या दोन मांडय़ांच्या बेचक्यात पुरती अडकलीत ते त्यांना पक्कं ठाऊक असतं.

वेदिका कुमारस्वामी म्हणजे लहानपणीच देवाशी लग्न लागलेली देवदासी. महाराष्ट्र-कर्नाटकाच्या कुठल्या तरी सीमाप्रदेशातली. पण आपल्या स्वत्वाची नि स्त्रीत्वाची पुरेपूर जाण असलेली. त्यामुळेच तर आजी-आईचंच प्राक्तन आपल्याही वाटय़ाला येणार हे ठाऊक झाल्यावरही तिला प्रश्न पडतात ते, स्वतच्या आणि एकूणच स्त्रीच्या अस्तित्त्वाविषयी-व्यक्तित्वाविषयी. तिच्या या एकूणच बाईपणाच्या भोगाविषयीच्या कविता ‘गावनवरी’ या पुस्तकात दिवंगत लेखिका-कवयित्री कविता महाजन यांनी संकलित अन् संपादित केल्या आहेत. वेदिकेच्या या कविता म्हणजे तिच्या आयुष्याचा मांडलेला प्रवासच आहे. मात्र तिचा हा प्रवास म्हणजे अस्वस्थ मनाचं शांतवन करत नेणारा आहे. स्त्रीमनाची-स्त्रीदेहाची जाणीव व्यापक करणारा आहे. म्हणजे एक प्रकारे निस्संग होण्याचाच हा अनुभव आहे. वेदिकाने आपला वैचारिक सांधा थेट प्रसिद्ध कन्नड संत कवयित्री अक्क महादेवी यांच्याशी जोडला आहे. सौंदर्यवान अक्क महादेवींनी एके क्षणी आपली सगळी वस्त्रं फेडून टाकली आणि त्यानंतर त्या आजन्म निर्वस्त्र राहिल्या. शरीराच्या बाह्यसौंदर्यापेक्षा त्यांनी मनाचं आंतरिक सौंदर्य नि पावित्र्य महत्त्वाचं मानलं. आपल्या वारकरी परंपरेतील संत कवयित्री विठाईने तरी काय वेगळं केलं? वासनेपोटी सतत शारीरिक छळ करणाऱ्या नवऱ्याला थेटच बजावलं… ‘तुझी सत्ता आहे देहावर समज, माझेवरी तुझे किंचित नाही’

वेदिकाच्या वाटय़ाला देवदासीपणाचे भोग आले खरे, पण कालौघात तिच्या आयुष्याचा, अनुभवांचा, जाणिवा-संवेदनांचा, विचारांचा पट एवढा विस्तारला की जणू काही तीच बनली आदिशक्ती-आदिमाया! जगाला खेळवणारी. अनेकांचा समज असतो की आपण बाईला खेळवतोय-नाचवतोय. परंतु अनेकदा प्रत्यक्षात पुरुष असतात बाईच्या हातातलं कचकडय़ाचं खेळणं. पुरुष समजतात तेवढय़ा बाया निर्बुद्ध कधीच नसतात. त्या चांगल्याच ओळखून असतात पुरुषाला.

वेदिका कुमारस्वामीच्या कविता वाचताना तिचा एकूण आत्मशोधाच्या दिशेने झालेला प्रवास पाहून माझ्याही मनात अगदी हेच आलं की स्त्रिया जात्याच खंबीर असतात. त्यांना पुरुषाचा कावा नेमका ठाऊक असतो. परिस्थितीच्या रेटय़ात सापडल्यावर सुरुवातीला त्या भेलकांडतात, कोसळतात पण लवकर सावरतातही. मग परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी पदर खोचून उभ्या राहतात. विशेषत शरीर विक्रयाच्या व्यवसायात आलेल्या महिला तर संपूर्ण समाजच कोळून पितात… खरं तर त्याच समाजपुरुषाला एका अर्थाने विचारत असतात- बा समाजपुरुषा तुजी औकात काय्ये?

…आणि मग अशा या समाजपुरुषाची औकात बघायला गेलं की, तो पार वेदकाळापासूनच गंडलेला दिसतो. कारण भारतात या व्यवसायाची पाळंमुळं अगदी वेदकाळातही सापडतात. किंबहुना तिथूनच स्त्री-देहाच्या व्यापाराला सुरुवात झालेली दिसते. वेदकाळात घरी आलेल्या पाहुण्याला आणि यज्ञ करणाऱया ब्राह्मणाला यजमानाने स्व-स्त्री भोगासाठी देण्याची प्रथा होती. फक्त तेव्हा या प्रथेत पैशाचा व्यवहार कुठेही नसल्यामुळे त्याला ‘वेश्या व्यवसाय’ किंवा ‘वेश्या वृत्ती’ असं म्हटलं गेलं नाही. पण त्याही आधी मुळात आदिम समाज जेव्हा गटा-गटाने राहात होता, तेव्हा स्त्री-पुरुष संबंध हे स्वैर होते. आई-मुलगा, बाप-मुलगी, बहिण-भाऊ अशी नातीच तेव्हा अस्तित्त्वात नव्हती. कालांतराने हे विविध गट-समूह एकत्र येऊन त्यातून एक मोठा समाज निर्माण झाला. या समाजातूनच पुढे कुटुंब व्यवस्था नि विवाह व्यवस्था जन्माला आली आणि विवाह व्यवस्थेतून लैंगिक स्वातंत्र्यावर आलेल्या बंधनांतून पुढे ‘वेश्या व्यवसाय’ सुरू झाला. म्हणजेच स्त्राr-पुरुषाच्या लैंगिक स्वातंत्र्यावर पडलेल्या मर्यादेतूनच वेश्या व्यवसायाला सुरुवात झाली. मात्र या व्यवसायात महिलाच आल्या, कारण तोपर्यंत मातृसत्ताक असलेली समाजपद्धती पितृसत्ताक झाली होती. परिणामी पुरुषांनी एकापेक्षा अधिक स्त्रियांशी ठेवलेले शरीरसंबंध ही समाजमान्य बाब झाली. थोडय़ाच काळात ती ‘वेश्या-संस्था’ म्हणून नावारूपालाही आली. या ‘वेश्या’ संस्थेचे दाखले अगदी रामायण-महाभारतातही सापडतात. जेव्हा राम विजयी होऊन परत आल्याची बातमी हनुमानाने भरताला सांगितली, तेव्हा भरताने उच्च कुळांतील सोळा स्त्रिया हनुमानाला बक्षिस दिल्याची माहिती वाल्मीकी रामायणातच आहे. तसंच पांडवांच्या विवाहाच्या वेळी आणि युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळीही त्यांनी हजारो स्त्रिया अनेकांना दिल्याची आणि त्यांनाही अनेक मिळाल्याची माहिती महाभारतात आहे. एवढंच कशाला इंद्र दरबारात साधारणपणे बेचाळीस अप्सरा असल्याची माहिती महाभारतात सापडते. यातल्या अनेक अप्सरा या कश्यप ऋषी व कपिलमुनींच्या मुली होत्या आणि त्यांना इंद्राबरोबरच इंद्र दरबारातील सर्व देवांना भोग द्यावा लागायचा.

म्हणजेच औकात काढायचीच झाली तर ती समाजपुरुषाची काढायला हवी. कारण त्यानेच आपल्या सोयीसाठी देवदासी प्रथा काय किंवा शरीर विक्रयाचा व्यवसाय काय सुरू केला… वेदिकाचा ‘गावनवरी’ हा कवितासंग्रह खरंतर 2018 मध्येच प्रकाशित झालेला. पण आता त्याची पुन्हा आठवण निघण्याचं कारण म्हणजे, नुकतंच रंगमंचावर आलेलं ‘तुजी औकात काये?’ हे संगीत नाटक. हे संगीत नाटक वेदिका कुमारस्वामीच्या ‘गावनवरी’ या कवितासंग्रहावर आधारित आहे. याचं नाटय़ रुपांतरण आणि दिग्दर्शन प्रतीक्षा खासनीस आणि निकिता ठुबे यांनी केलं आहे. तर त्यांच्या सोबतीला कल्पेश समेळ, स्वप्नील भावे आणि दीप डबरे ही कलावंत (आणि वादकही) मंडळी आहेत. अर्थात मुख्य कलावंत प्रतीक्षा आणि निकिता या दोघीच आहेत. कारण त्याच कधी कथन, तर कधी गायनाच्या माध्यमातून वेदिकाच्या कविता सादर करतात आणि त्यातूनच वेदिकाच्या आयुष्याची गोष्ट पुढे नेतात.

एक प्रयोग म्हणून ‘तुजी औकात काये?’चा खेळ निसंशय सुरेख आहे. तो खेळ पाहताना कलावंतांच्या पेहरावापासून ते गाण्यांपर्यंत सारंच प्रेक्षकांच्या मनाचा कब्जा घेतं. वेदिकाची गोष्ट सांगण्याची कलावंतांची तळमळ रसिकांपर्यंत पुरेपूर पोहोचते. अन् तरीही काही गोष्टी अगदी कळत नकळत खटकतात. त्यात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीलाच म्हटलेली गणपतीची स्तुती करणारी नांदी. अर्थात या सादरीकरणाला ‘संगीत नाटक’ संबोधल्यामुळे संकेतानुसार नांदी आवश्यकच होती. परंतु संपूर्ण नाटकाचा आकृतिबंध बघितला तर हा खेळ म्हणजे संगीत नाटकाऐवजी, ती एक संगीतिकाच होती. त्यामुळे पारंपरिक नांदीऐवजी सुरुवातीला (वेदिका देवदासी असल्यामुळे) देवदासींचंच त्यांच्या इष्टदेवतेची स्तुती करणारं एखादं पारंपरिक लोकगीत घेतलं असतं तर ते अधिक संयुक्तिक ठरलं असतं. तसंच लोकगीताच्या धर्तीवरची नांदी वेगळीही ठरली असती. तसंच या प्रयोगात निकिता आणि प्रतीक्षा थेट गात असल्यामुळे त्यांच्या साथीसाठी तबला, पेटी, ढोलक, गिटार अशी वेगवेगळी वाद्यं आहेत. अगदी घुंगरुही आहेत. मात्र या वाद्यांच्या जोडीला देवदासींच्या गाण्यांत हमखास वाजवलं जाणारं चौंडकं असतं, तर या खेळाला अधिक खरेपणा आला असता. वास्तविक या खेळाला संगीत नाटकाऐवजी किंवा संगीतिकेऐवजी देवदासींचा जो मेळा असतो तशा मेळ्याचा आकृतिबंध दिला असता तर वेदिकेच्या कवितेचा आणि तिच्या आयुष्याचा रसिकांवर अधिक प्रभाव पडला असता.

असं असलं तरी आता सादर होत असलेल्या ‘तुजी औकात काये?’चं मोठेपण आहेच. वेदिकाच्या कविता आणि तिचं आयुष्य रंगमंचावर आणण्याचं या मंडळींनी केलेलं धाडस नक्कीच वाखाणण्याजोगं आहे!
>> [email protected]