सचिन वाझे गुन्हेगार; विश्वास ठेवण्यालायक नाही, हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांचा फडणवीसांवर हल्ला

सचिन वाझे हा गुन्हेगार आहे. ही व्यक्ती विश्वास ठेवण्यालायक नाही असे हायकोर्टाने म्हटले आहे, असा दाखला देत माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी सचिन वाझेने केलेल्या आरोपांना उत्तर दिले.

नागपूरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अनिल देशमुख यांनी म्हणाले की, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. मुंबई हायकोर्टानेही वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्याचे म्हटले होते. त्याच्यावर दोन खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाझेच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे हायकोर्टाने म्हटले.

पुढे देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाघात चढवला. सचिन वाझेला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी मी फडणवीस यांच्याबाबत गौप्यस्फोट केला होता. फडणवीस यांनी प्रतिज्ञापत्र पाठवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांना अडकवण्यास सांगितले होते. या गौप्यस्फोटानंतर फडणवीस यांनी वाझेला हाताशी धरून माझ्यावर आरोप केले आहेत.

तुरुंगातील लोकांकडे भाजपच्या प्रवक्तेपणाची जबाबदारी; महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, वाझेंच्या आरोपांनंतर संजय राऊत कडाडले

मुंबई हायकोर्टाने वाझेबाबत काय म्हटले हे फडणवीस यांना माहिती नाही का? सचिन वाझे हा गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. परंतु त्याच व्यक्तीला हाताशी धरून माझ्यावर आरोप केले जात आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला.