सिनेमा – हिट द फर्स्ट केस

>> प्रा. अनिल कवठेकर

इंग्रजीत असे म्हटले जाते की, in every crime there are one of the 3 w’s – women, wealth and wine! प्रत्येक खुनामागे स्त्री, संपत्ती आणि दारू या तीन कारणांपैकी एक कारण असते. पण कधी कधी खून न करण्याची इच्छासुद्धा खून करण्याचे कारण ठरू शकते. विचार केल्यानंतर काहीतरी गोंधळ झाला आहे असे वाटायला लावणारे हे विधान आहे. परंतु कधी कधी असे घडू शकते असे वाटायला लावणारे कथानक ‘हिट – द फर्स्ट केस’ या चित्रपटात पाहायला मिळते.

इन्स्पेक्टर विक्रमच्या (राजकुमार राव) मनावर कुठल्यातरी प्रसंगामुळे मानसिक ताण आलेला असतो. त्यामुळे तो मनाने आजारी आहे. मानसिक तणावामुळे डॉक्टर त्याला नोकरी सोडायला सांगते. कारण या नोकरीत वारंवार धोक्याचे प्रसंग येत असल्यामुळे त्याचा ताण वाढत असतो. तो प्रसन्न नसतो. डोळ्यांत सतत काहीतरी शोधण्याचा भाव असतो. जणू काहीतरी खूप जवळचे हरवले आहे. मृत शरीर किंवा आगीचा लोळ पाहिला की, त्याचे मन बिथरायला लागते. हात थरथरायला लागतात. शरीर कापायला लागते. पण तो हुशार असल्याने खुनाचा शोध घेण्याची आणि तिथल्या परिस्थितीचे निरीक्षण करण्याची त्याच्याकडे एक अनोखी शैली आहे. ज्या टीमला सहा तास शोधूनही डेड बॉडी सापडत नाही. तीच बॉडी अवघ्या सहा मिनिटांत तो शोधतो.

डाक्टरांचा सल्ला मानून विक्रम काही दिवसांकरिता विश्रांतीसाठी रजेवर जातो आणि एक नवी कथा सुरू होते. प्रीती नावाची एक मुलगी आपल्या गाडीने बाहेर पडते. तिची गाडी खराब होते म्हणून इन्स्पेक्टर इब्राहिम तिला मदत करतो. ती मदत नाकारते, पण त्याच्या फोनवरून वडिलांना बोलावून घेते. त्यादरम्यान इब्राहिमच्या दोन फेऱ्या त्या रस्त्यावरून होतात. तेव्हा त्याला ती एका गाडीवाल्याशी बोलताना दिसते. पण जेव्हा तो परत त्या रस्त्याने जाते तेव्हा ती हरवलेली असते आणि तिचे वडील त्या गाडीजवळ उभे राहून तिला संपर्क करत असतात. इन्स्पेक्टर इब्राहिम हा एक उद्धट इन्स्पेक्टर असल्यामुळे सस्पेंड होतो. इब्राहिमने सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलेली आकाशी रंगाची गाडी कुठेही क्रॉस झालेली नसते. ज्या गाडीतल्या ड्रायव्हरशी प्रीती बोलत असते ती गाडी टोल नाक्यावरून क्रॉस न होता कुठे गायब होते? तेच खरे रहस्य आहे.

याच दरम्यान विक्रमची प्रेमिका नेहासुद्धा (सान्या मल्होत्रा) गायब झालेली आहे. चित्रपटातील रहस्याचा गुंता अधिकाधिक वाढत जातो. ही केस विक्रमला द्यायला वरिष्ठ अधिकारी तयार नसतात. विक्रम त्याच्या पद्धतीने नेहाचा शोध घ्यायचे ठरवतो. एकाच वेळी दोन मिसिंग केसेस आणि एक खून यांचा तपास सुरू होतो. नेहाची केस शोधता शोधता विक्रम प्रीतीच्या केसमध्ये जास्त गुंततो. ती ज्या अनाथाश्रमाला देणगी देत असते त्या आश्रमाची, तिच्या पालकांची, तिच्या कॉलेजच्या प्रिन्सिपालची सगळ्यांची तो कसून चौकशी करतो. तात्पुरता नेहाचा विषय बाजूला सरतो. प्रीतीच्या मिसिंग केसचा विषय आपल्याला पकडून ठेवतो.

केसमधील सर्वच संशयित एकत्र यावेत म्हणून तो प्रीतीच्या पालकांना एक पूजा ठेवायला सांगतो आणि सर्वांना निमंत्रित करायला सांगतो. त्याच्या अंदाजाने जर संशयित आला तर त्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्याला ओळखता येईल आणि नाही आला तर कोण नाही आला याचा शोध घेता येईल. तो थोडासा वेगळा विचार करणारा अधिकारी आहे. प्रीतीच्या ओळखीची एक शीला नावाच्या घटस्फोटितेच्या गाडीत डेड बॉडी कुठे आहे हे सांगणारे पत्र मिळते. तिची अधिक चौकशी केल्यानंतर ती सांगते की, मी घटस्फोटित असल्यामुळे मला समाजात कोणी मान देऊन बोलावत नव्हते. मी हे जाणीवपूर्वक केले आहे. चित्रपटातील रहस्याचा विषय त्या वेळी जरा इकडे तिकडे जातो किंवा दिग्दर्शकाने ते जाणीवपूर्वक तसे केले असावे. कारण मूळ विषय दोन मिसिंग मुलींचा आहे. प्रीतीला अनेकांनी रस्त्यावर पाहिले असते, पण तिच्या गाडीने टोल क्रॉस केलेला नसतो. ती ज्या आकाशी गाडीजवळ उभी दिसते तिनेसुद्धा टोल क्रॉस केलेला नसतो. अशी एक अशक्य गोष्ट घडलेली आहे आणि तीच गोष्ट या चित्रपटातील खरा खुनी शोधण्यास मदत करणार आहे. त्या विषयावर जास्त फोकस न करता विक्रम विषयाच्या पलीकडे असणाऱ्या अनेक विषयांना स्पर्श करत पुढे पुढे जातो.

विक्रम एक उत्तम अधिकारी आहे, पण मानसिकदृष्टय़ा तो दुबळा दाखवलेला आहे. यज्ञातील अग्नी पाहिल्यानंतर अस्वस्थ होऊन त्याला घाम फुटतो. चक्कर येते. डेड बॉडी पाहिल्यानंतरही त्याला घाम फुटतो. तरी तो त्या दिशेने जातो. हे दाखवण्यामागे दिग्दर्शकाला नेमके काय सांगायचे आहे ते कळत नाही? नायकात दुबळेपण असूनही तो केसचा अभ्यास करतो असे सांगायचे आहे? अनेकदा स्वप्नात त्याला सुश्मीवर पेट्रोल टाकून ती जळताना दिसते. ते जाळणारे कोण? तो त्यांचा शोध का घेत नाही? ती केस नक्की कुठे घडते? ती केस चालू आहे का बंद आहे, हे स्पष्ट होत नाही.

शेवटी प्रीतीच्या बॉडीचा शोध लागतो, पण अजून नेहा बेपत्ता  आहे. नेहाचा कोणताच सुगावा लागलेला नाही. प्रत्येक घटनेनंतर घाबरणारा, थरथरणारा विक्रम बऱ्याचदा जुन्या ‘मजबूर’मधल्या अमिताभची आठवण करून देतो. पण त्याचे हे घाबरणे त्याच्या इन्स्पेक्टर असण्याला शोभत नाही. तसेच अतिशय स्मार्ट असणारा विक्रम नेहा आणि प्रीतीच्या केसमध्ये मात्र इकडे तिकडे भरकटताना दिसतो. त्याचे भरकटणे नायक म्हणून प्रेक्षकांना पटणे थोडेसे अवघड आहे. प्रीतीच्या मृत शरीरावर चार संशयितांच्या खुणा आढळतात. त्यापैकी तीन जण माहितीतले आहेत. .

शेवटच्या टप्प्यात सीसीटीव्ही फुटेज तपासताना ज्या वेळी प्रीती जिथे उभी होती, त्यावेळी तिथे एका ट्रकने टोल नाका क्रॉस करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ घेतल्याचे दिसते. पण त्यात ट्रक ड्रायव्हरचा चेहरा  दिसत नसतो. जी गोष्ट आधी तपासायला हवी ती शेवटच्या टप्प्यात का तपासली आहे, ते लक्षात येत नाही. ईशा नावाची एक बाई पुन्हा काही माहिती पुरवते. तिने सांगितलेली आम्बेसेडर कार विक्रमला दिसते. विक्रम शोध घेतो, पण प्रत्येक वेळी तो चुकीच्या पत्त्यावर पोहोचतो. खरा गुन्हेगार फार दूर असल्याचा भ्रम तयार केला जातो. विक्रमचे सगळे अंदाज चुकतात. गुन्हेगार जवळचाच असावा असा संशय येतो. इब्राहिमच्या मदतीने पुन्हा विक्रम त्या गॅरेजजवळ पोहोचतो. गॅरेजवाला त्यांच्यावर फायरिंग करतो. पावसातली हाणामारी फिल्मी नसून खरी वाटते. ज्यात नायकही खूप मार खातो. ही हाणामारी होत असताना अचानक एका झाडावर वीज पडते. झाड जळू लागते आणि त्या ज्वाळा पाहून विक्रम घाबरतो. तो घाबरून गुडघ्यावर बसल्यानंतर इब्राहिम तिथे येतो आणि गॅरेजवाला फायरिंग करतो. विक्रमला गोळी न लागता इब्राहिमला लागते. विक्रम इब्राहिमकडे पाहतो. आपल्यावर कोणी फायरिंग करेल, असे विक्रमला का वाटत नाही? तो त्या पद्धतीने कृती का करत नाही? असा विचार मनात येतो. इथे जो सहकारी इन्स्पेक्टर विक्रम काम करतो तोच विक्रमला वाचवतो.

पकडलेला गॅरेजवाला त्यांना एका बंगल्यात घेऊन जातो आणि या बंगल्यातच सगळा सस्पेन्स लपला आहे.

विक्रम सुश्मीला जळताना पाहतो. ती विक्रमची नक्की कोण? हे स्पष्ट होत नाही. विक्रमची प्रेयसी नेहाही त्याला अनेक वेळा विचारते. तो सांगायचे टाळतो. अगदी शेवटच्या दृश्यामध्येही त्याला विचारले जाते, पण तो सांगतो की, पुढच्या वेळेस सांगेन. शेवटी जीपमध्ये बसताना कोणीतरी त्याच्यावर गोळी चालवते. ती गोळी जीपला लागते. गोळी जीपला लागल्यानंतर हा गोळी मारणाऱ्याकडे पाहतो. त्यावेळी त्याने लपायला हवे. कारण दुसरी गोळी त्याला लागू शकते. चित्रपट हा मर्डर मिस्ट्रीवर असला तरी एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून आपल्यावर हमला झाल्यानंतर दुसरी गोळी न लागण्याची काळजी घेण्यासाठी जी संरक्षक भूमिका नायकाने घ्यायला हवी ती भूमिका नायक विक्रम घेताना कुठेही दिसत नाही. चित्रपट भरकटतो. विनाकारण लांबी वाढवली आहे असे वाटते. पण मूळ कथा चांगली असल्याने चित्रपट आपल्याला पकडून ठेवतो. पटकथेमध्ये काही त्रुटी असल्या तरी आपला वेळ व पैसा वसूल करणारी ही मर्डर मिस्ट्री आहे. ही फर्स्ट केस असल्यामुळे याचा सेकंड भाग नक्कीच येईल. कारण तेलुगूमध्ये आला आहे.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)