भंडारा जिल्ह्यात 19 ते 29 जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पुर्णतःपाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
राज्यात युतीचे सरकार असून शिंदे – फडणवीस – पवार या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला.या योजनेतंर्गच सरकारला बहिणी लाडकी झाली, भाऊ लाडका झाला पण अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला तो शेतकरी राजा.या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना “नाथा फरक करू नको रे”, अशी विनवणी लाखांदूर तालुक्यातील कऱ्हाडला येथील जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना एका फलकाद्वरे केली आहे. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसल्याने जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्यात सातही तालुके मिळून 99 हजार 996 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती.यात अतिवृष्टीमुळे 23 हजार 260 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यात एकूण ५१९ गावांमधील शेतशिवाराचा समावेश असून त्यात 49 हजार 197 शेतकरी बाधित झाले आहेत.त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एका एकरामागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतावरील पीक कर्ज माफ करा नाहीतर मुख्यमंत्रीसाहेब शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही.ज्या पद्धतीने तुम्हाला बहिणी लाडकी झाली आणि भाऊ लाडका झाला, त्या पद्धतीने मात्र शेतकऱ्याला परका करू नका आणि शक्यतो लवकर आम्हा शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ द्या,ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माझी विनंती आहे” असे फलकावर लिहून या शेतकऱ्याने मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान केले आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची भात शेती ही पाण्याखाली गेली आहे. धान लागवडीसाठी शेतकऱ्यानी कर्ज काढले होते मात्र आता पाण्यामुळे शंभर टक्के पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्याना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी करण्यात येत आहे.