बेकायदेशीर सिम बॉक्सच्या सहाय्याने भिवंडी परिसरात अनधिकृतपणे सुरू असलेला टेलिफोन ऐक्सचेंजचा गोरखधंदा दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने उद्ध्वस्त केला. अशा प्रकारे बोगस टेलिफोन एक्सचेंज चालविणाऱ्या एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. गेल्या दीड वर्षांपासून हे टेलिफोन एक्सचेंज सुरू असल्याने त्यात केंद्र सरकारचे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भिवंडी परिसरातील नालासोपारा, गौरीपाडा आणि रोशनबाग येथे बेकायदेशीर सिम बॉक्सच्या सहाय्याने अनधिकृतपणे टेलिफोन ऐक्सचेंज सुरू असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दिनस्टार कंपनीचे नऊ सिम बॉक्स, विविध कंपन्यांचे 146 सीम कार्ड, विविध कंपन्यांचे आठ वायफाय राऊटर, सिम बॉक्स चालविण्यासाठी वापरण्यात येणारे 198 अॅण्टीना, इन्व्हर्टर असा एक लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान या कारवाईत जाफर पटेल (40) या व्यक्तीला पकडण्यात आले. चौकशीत त्याने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने हे बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवत असल्याचे सांगितले. शिवाय गेल्या दीड वर्षापासून हा गोरखधंदा सुरू होता. त्यामुळे दूरसंचार विभाग, हिंदुस्थान सरकार आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तब्बल तीन कोटी रुपयांचे या बोगस टेलिफोन एक्सचेंजमुळे केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. एटीएसने जाफर पटेल याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.