शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ज्येष्ठ घटनातज्ञ डॉ. उल्हास बापट आणि प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रश्मी ठाकरे या उपस्थित होत्या.
उद्धव ठाकरे हे पुण्यात उद्या होणाऱ्या शिवसंकल्प अभियान ‘चला जिंकूया…’ या शिवसेना गटप्रमुखांच्या शिबिरासाठी आज पुण्यात दाखल झाले. त्यांचे पुण्याच्या वेशीवर रावेत येथे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ घटनातज्ञ अॅड. उल्हास बापट यांची प्रभात रोड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. बापट कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. तर उद्धव ठाकरे यांनी बापट यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्यामध्ये सुमारे एक तासभर चर्चा आणि कौटुंबिक गप्पा झाल्या.
विधिज्ञ अॅड. असीम सरोदे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी सरोदे यांचे सहकारी वकीलदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि सरोदे यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. सरोदे यांनी त्यांना अनेक बाबींवर माहिती दिली. शिवसेना सचिव विनायक राऊत यावेळी उपस्थित होते.