स्थळः गणेश कला-क्रीडा मंच, स्वारगेट
वेळ : सकाळी 10 वाजता
जनतेला न्याय देण्याचा, महाराष्ट्रधर्म राखण्याचा, महाराष्ट्रद्रोह्यांना धूळ चारण्याचा आणि गद्दारांचा कडेलोट करण्याचा निर्धार करून शिवसेनेने आता विधानसभेच्या दिशेने कूच केले आहे. चला जिंकूया… अशी गर्जना करत शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा उद्या पुणे येथे होत आहे. त्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जोमाने कामाला लागली आहे. पुण्याच्या स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा मंदिरात उद्या सकाळी 10 वाजता शिवसंकल्प मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांत सातत्याने केलेल्या घणाघातांनी भारतीय जनता पक्ष आणि मिंधे सरकार हादरले आहे. त्यामुळे उद्याच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना नेते-खासदार व पुणे जिल्हा संपर्क नेते संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, सुषमा अंधारे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव-आमदार मिलिंद नार्वेकर, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, महिला जिल्हा संपर्क संघटक स्नेहल आंबेकर आदींचीही या मेळाव्याला उपस्थिती राहणार असल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आले आहे.
View this post on Instagram
शिवसेनेच्या टीझरला नेटकऱ्यांची पसंती
या शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त शिवसेनेकडून आज एक टीझरही जारी करण्यात आला. ‘महाराष्ट्र हा लेचापेच्यांचा नाही मर्दांचा देश आहे आणि जो महाराष्ट्राला नडेल त्याला महाराष्ट्र गाडेल…’ हे उद्धव ठाकरे यांचे या टीझरमधील शब्द विरोधकांच्या अंगावर काटा आणणारे असेच आहेत. या टीझरला शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींबरोबर असंख्य नेटकऱ्यांनीही पसंती दिली असून तो सोशल मीडियावरही तुफान व्हायरल झाला आहे.