पत्नीचा बेडरूममध्ये तर पतीचा मृतदेह इमारतीजवळ आढळून आल्याची घटना आज गोरेगाव येथे घडली. किशोर पेडणेकर आणि डॉ. राजश्री पेडणेकर अशी मृतांची नावे आहेत. नैराश्यातून किशोर याने सुरुवातीला डॉ. राजश्रीची हत्या केली. त्यानंतर किशोर याने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचे बोलले जाते. तपासानंतर काही बाबीचा उलगडा होणार आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र अपमृत्यूची नोंद केली आहे.
किशोर हे गोरेगावच्या टोपीवाला सोसायटीत राहत होते. ते दहिसर येथे जिम उपकरण पुरवण्याचे काम करायचे. तर डॉ. राजश्री या मालाड येथे फिजिओथेरेपी क्लिनिक चालवत असायच्या. किशोर हे गेल्या काही महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त होते. आज पहाटे गोरेगाव पोलिसांना एक फोन आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले. सोसायटीच्या आवारात किशोर हे मृत अवस्थेत आढळून आले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यासाठी पोलीस इमारतीच्या तिसऱया मजल्यावर गेले. तेव्हा डॉ. राजश्री या बेडरूममध्ये मृत अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांना असा संशय आहे की किशोर याने विषप्राशन करून पाचव्या मजल्यावरून उडी मारली असावी. पाचव्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर ते थेट जमिनीवर पडले नाहीत, सोसायटीमधील एका झाडाच्या फांदीमध्ये अडकले. किशोर यांच्या वजनाने ती फांदी तुटली. फांदी तुटल्याने ते खाली पडले. परिणामी किशोर यांच्या डोक्याला इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
मुलाची भेट राहिली अपूर्ण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाला मेसेज केला. नातेवाईकाला बँकेचे तपशील दिले. तसेच जीवन संपवणार असे त्यात नमूद केले होते. किशोर आणि डॉ. राजश्री हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी दिल्लीला विमानाने जाणार होते. पोलिसांना विमान तिकिटाची प्रत आढळली आहे.