Paris Olympics 2024 – लक्ष्य सेनची ऐतिहासिक कामगिरी, ठरला ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनल गाठणारा पहिला हिंदुस्थानी पुरुष बॅडमिंटनपटू

हिंदुस्थानचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनल सामन्यात तैवानच्या चाऊ तिएन चेनचा पराभव करत त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. लक्ष्य सेन ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला हिंदुस्थानी पुरूष बॅडमिंटनपटू ठरला आहे.

लक्ष्य सेनने प्री क्वार्टर फायनलमध्ये आपलाच साथीदार एच. एस. प्रणॉयचा पराभव करत क्वार्टर फायलनमध्ये प्रवेश केला होता. क्वार्टर फायनलमध्ये त्याचा सामना तैवानच्या चाऊ तिऐनविरुद्ध रंगला. सुरुवातीला तैवानच्या चाऊने सामन्यावर पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र लक्ष्य सेनने त्याचे मनसुबे उधळून लावत जोरदार कमबॅक केले आणि सामना खेचून आणला. लक्ष्य सेनने चाऊ तिऐनला 19-21, 21-15 आणि 21-12 अशा फरकाने पराभूत केले आणि सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. या विजयसोबतच लक्ष्य सेन ऑलिम्पिक इतिहासात सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला हिंदुस्थानी पुरूष बॅडमिंटनपटू ठरला आहे. त्यामुळे एक प्रकारे लक्ष्य सेनचा हा विजय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवण्यात आला आहे. वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये फायनल पर्यंत मजल मारणाऱ्या 22 वर्षीय लक्ष्य सेनकडे पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश करून सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.