
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
भारतीय सैन्याने जम्मू–उधमपूर भागामध्ये अतिरिक्त सैन्य आणि स्पेशल फॉर्सेस तैनात केले आहेत. ज्यामुळे येणाऱ्या काळात दहशतवादी विरोधी अभियानाला वेग मिळेल. आत घुसलेले 50-60 दहशतवादी जिवंत नक्कीच परत जाणार नाहीत, यात शंका नको, परंतु ही झाली संरक्षणात्मक कारवाई. यानंतरसुद्धा पाकिस्तान पुन्हा दहशतवादी कश्मीरमध्ये घुसवू शकतो. म्हणून पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक कारवाई जरुरी आहे. पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान आणि तेहरिक–ए–तालिबानच्या मदतीने हल्ले करून त्यांचे नुकसान केले पाहिजे.
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे. हे हल्ले आता कश्मीर खोऱ्याऐवजी पिर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेला जम्मू-उधमपूर भागामध्ये होत आहेत. याआधी दहशतवादी कश्मीर खोऱ्यामध्ये सॉफ्ट टार्गेट, म्हणजे हिंदू स्त्रिया, तिथे काम करायला आलेले बाहेरच्या प्रदेशातील नागरिक यांवरती हल्ले करून त्यांना मारायचे. मात्र आता हल्ले सुरक्षा दल खासकरून भारतीय सैन्यावर होत आहेत. यामध्ये दहशतवादी नक्कीच मारले जात आहेत, परंतु भारतीय सैन्यालासुद्धा रक्त सांडावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये 32 दहशतवादी हल्ल्यांमध्ये 17 नागरिक, 19 सैनिक आणि 33 दहशतवादी मिळून 69 ठार झाले.
कश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हिंसाचार वाढवून पाकिस्तानला कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशझोतामध्ये आणायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानने त्यांच्या स्पेशल फॉर्सेसचे 600 सैनिक घुसवून कारगिलसारखी परिस्थिती निर्माण करण्याची तयारी केली आहे, अशा बातम्या येत आहेत. अर्थात या बातम्या अतिरंजित आहेत आणि इतके दहशतवादी आत येणे सोपे नाही.
मुख्य प्रश्न असा आहे की, पाकिस्तान आताच हल्ले का करत आहे? याकरिता काही महत्त्वाची कारणे आहेत. एक तर जम्मू भागातील राष्ट्रीय रायफलना तिथे दहशतवाद संपल्यामुळे लडाखमध्ये चीनच्या विरोधात तैनात केले गेले. तिथे जी पोकळी निर्माण झाली त्याचा गैरफायदा घेत पाकिस्तानने दहशतवादी घुसवले आहेत. दुसरे आता दहशतवाद्यांची घुसखोरी ही एलओसीवरून व्हायच्याऐवजी आंतरराष्ट्रीय सीमेवरून होत आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला ही घुसखोरी थांबवण्यामध्ये यश मिळालेले नाही. एलओसीचे रक्षण करण्याकरिता भारतीय सैन्य तैनात आहे आणि तिथे 95 टक्के दहशतवादी हे एलओसीवरच मारले जातात, जसे मागच्या आठवडय़ात दोन दहशतवादी पुंचमध्ये मारले गेले.
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे सर्वात मोठे राजकीय नेते नवाझ शरीफ यांनी विधान केले होते की, त्यांना भारताबरोबर आपले संबंध सुधारायचे आहेत. परंतु आता असे दिसते की, पाकिस्तान सरकारला फारसे महत्त्व नाही आणि पाकिस्तानी सैन्य काय करायचे याचा निर्णय घेईल. विविध कारणांमुळे पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा पाकिस्तानमध्ये रसातळाला पोहोचलेली आहे आणि त्यांना वाटते की, कश्मीरमध्ये हिंसक कारवाया करून ते पाकिस्तानी सैन्याचे महत्त्व वाढवू शकतील.
सामरिक किंवा स्ट्रटेजिक लेव्हलला पाकिस्तानला वाटते आहे की, सध्याच्या भारत सरकारला कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी बरोबरच्या राजकीय पक्षांना बरोबर घेऊन चालावे लागेल. त्यामुळे कठीण कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नंबर तीन करायला अडचणी येत असाव्यात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात सगळीकडे गोंधळ माजलेला आहे आणि 50 ते 60 ठिकाणी जगात विविध कारणांमुळे युद्ध सुरू आहे. भारताकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे जगाचा पोलीस अमेरिका सध्या त्याच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये गुंतलेला आहे आणि त्याचे बाकी कुठेच लक्ष नाही. याशिवाय जगाचे लक्ष हे युक्रेन युद्ध आणि इस्रायल विरुद्ध हमास, हेझबुल्ला युद्धाकडे जास्त आहे. कारण तिथे प्रचंड हिंसाचार होत आहे. हे कमी की काय म्हणून चीन तैवानविरुद्ध सतत आक्रमक कारवाया करत आहे आणि साऊथ चायना समुद्रामध्येसुद्धा चिनी आक्रमक कारवाया वाढल्या आहेत, ज्याविषयी 30 जुलैला मीडियामध्ये बातम्या आल्या आहेत. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना वाटते की, युक्रेन युद्ध व इस्रायलचे युद्ध याचा फायदा घेऊन एखाद्या वेळेला चीन आता तैवानवर हल्ला करेल. म्हणून अमेरिकेचे लक्ष हे तैवानला सुरक्षित करण्यामध्ये केंद्रित झालेले आहे.
एवढेच नव्हे तर नंबर तीनची महाशक्ती युरोपसुद्धा सध्या प्रचंड अस्वस्थ आणि कठीण परिस्थितीतून जात आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचा खेळ सुरू असताना तिथे सायबर हल्ले केले जात आहेत आणि अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. युरोपमध्ये प्रस्थापित सरकारे बदली होत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमुळे युरोपचे लक्ष त्यांच्यासमोर असलेल्या आर्थिक आव्हानांवर आहे. कश्मीर हा त्यांच्याकरिता महत्त्वाचा मुद्दा नाही.
यामुळे कश्मीरमध्ये काय चालले आहे यावर जगाचे फारसे लक्ष नाही. आता जगातली कुठलीही महाशक्ती पाकिस्तानला दहशतवाद थांबवा, हे सांगायला तयार नाही. पाकिस्तानकडे दहशतवाद वाढवण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यांचे अर्धे सैनिक पाकिस्तानच्या आत चाललेल्या बलुचिस्तान किंवा तेहरिक-ए-तालिबान विरोधी अभियानामध्ये गुंतलेले आहे. म्हणून पाकिस्तानला कश्मीरमध्ये हिंसाचार वाढवून पाकिस्तानी जनतेचे लक्ष कश्मीरकडे वळवायचे आहे.
पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान आणि तेहरिक-ए-तालिबानच्या मदतीने हल्ले करून त्यांचे नुकसान केले पाहिजे. पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईकमध्ये तोफखान्याचा वापर किंवा क्षेपणास्त्रांचा वापर किंवा हवाई दल, नौदलाचा वापर किंवा स्पेशल फॉर्सेसकडून सर्जिकल स्ट्राईक असे अनेक उपाय उपलब्ध आहेत आणि त्यामधून कुठला उपाय वापरायचा हे ठरेलच. परंतु पाकिस्तानकरिता एक राजकीय संदेशसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे की, भारतातील सारे राजकीय पक्ष आणि पूर्ण देश पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याकरिता भारतीय सैन्याच्या मागे उभा आहे. पाकिस्तानला धडा शिकवावा, अशा प्रकारचा ठराव जर लोकसभेत एक मताने पार केला गेला तर पाकिस्तानला आणि पर्यायाने चीनलासुद्धा एक मेसेज मिळेल की, भारतीय एकत्रितरीत्या पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्याकरिता तयार आहेत.