हिंदुस्थानच्या हॉकी संघाने ऐतिहासीक कामगिरी करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल केली आहे. चौथ्या सामन्यात बेल्जियमविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाच्या हॉकी संघाने धमाकेदार पुनरागमन केले आणि ऑस्ट्रेलियाचा 3-2 अशा फरकाने पराभव केला आहे. विशेष म्हणजे 1972 साला नंतर प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानच्या हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
बेल्जियमविरुद्ध झालेल्या चौथ्या सामन्यात हिंदुस्थानच्या संघाला 1-2 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियापुढे ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान होते. मात्र टीम इंडियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सामना आपल्या मुठीत ठेवला होता. 12 व्या मिनिटाला अभिषेकने गोल करत टीम इंडियाचे खाते उघडले, तर दुसऱ्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनेल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करत सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला, मात्र 25 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पहिला गोल करत आपले खाते उघडले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत संघासाठी पुन्हा एकदा धाऊन आला आणि त्याने 32 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे 3-1 अशा फरकाने टीम इंडिया पुढे होती. मात्र 55 व्या मिनिटाला ब्लेक गोवर्सने ऑस्ट्रेलियासाठी दुसरा गोल करत सामन्यात चुरस निर्माण केली. शेवटच्या पाच मिनिटांच्या वेळेत टीम इंडिया 3-2 अशा फरकाने पुढे होती. या दरम्यान ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले, मात्र टीम इंडियाचा दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि बचाव फळीने ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावले आणि सामना जिंकत इतिहास रचला.