नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला चांगलाच दणका बसला. या निवडणुकीत नाशिकमधून महाविकास आघाडीच्या शिवसेनेकडून ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) राजाभाऊ वाजे रिंगणात उतरले होते. त्यावेळी हा खोड्यातील माणूस याला इंग्रजी जमणार नाही, अशी टीका विरोधकांनी प्रचारादरम्यान केली होती. मात्र, राजाभाऊ वाजे यांनी विरोधकांची बोलतीच बंद केली आहे. त्यांनी लोकसभेत अस्खलीत इंग्रजीत भाषण करत नाशिकमधील गंभीर समस्या मांडली आहे. त्यांच्या इंग्रजीतील भाषणाने विरोधकांची बोलतीच बंद झाली आहे.
राजाभाऊ हा खेड्यांतील माणूस आहे, त्यांना इंग्रजी जमणार नाही, अशी टीका राजाभाऊ वाजे यांच्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान झाली होती. मात्र, राजाभाऊ वाजेंनी आता लोकसभेत जबरदस्त इंग्रजीत भाषण करत विरोधकांना प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत नाशिकमधील आरोग्यविषयक प्रश्न मांडला आहे.
लोकसभेत राजाभाऊ वाजे म्हणाले की, हेल्थ पॉलिसींवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. कुंभमेळा माझ्या मतदारसंघात आयोजित केला जातो. नाशिकमधील कुंभमेळा सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक विधी आहे. यामध्ये मोठा संख्येने साधू आणि साध्वी सहभागी होत असतात. युनेस्कोने कल्चरल हेरिटेजमध्ये याचा समावेश केला आहे. मात्र, नाशकातील रुग्णालये अद्ययावत नाहीत. इतर आरोग्य सुविधाही रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नाहीत. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांची संख्या पाहाता, सार्वजनिक आरोग्याचा विचार करुन सरकारकडून पाऊले उचलण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोक अजूनही आरोग्य सुविधांपासून वंचित आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी राजाभाऊ वाजे यांनी इंग्रजीत भाषण करत केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली होती. शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा त्यांनी पराभव केला होता. दोन वेळा खासदारकी मिळविलेल्या हेमंत गोडसे यांचा तब्बल एक लाख साठ हजारांच्या फरकाने वाजे यांनी पराभव केला.