मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. एका जुन्या प्रकरणात त्यांना बजावण्यात आलेले अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले आहे.
नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले होते. या प्रकरणी दाखल असलेल्या सुनावणीला शुक्रवारी जरांगे-पाटील स्वत: हजर राहिले.
रुग्णवाहिकेतून ते कोर्टात आले. यावेळी त्यांनी आजारी असल्याची कागदपत्र आणि रुग्णालयाने दिलेली कागदपत्रंही कोर्टासमोर ठेवली. त्यानंतर कोर्टाने त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द केले. मात्र त्यांना यासाठी कोर्टात नव्याने बॉण्ड भरून द्यावा लागणार आहे, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
दरम्यान, सुनावणीवेळी कोर्टाने जरांगे-पाटील यांना समजही दिली. जरांगे-पाटील माध्यमांसमोर बोलताना कोर्टावर टीका-टिप्पणी करतात. याची कोर्टाने दखल घेत त्यांना समज दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मराठा आंदोलनक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.