कल्याणमध्ये भले मोठे होर्डिंग कोसळले; गाड्यांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही, थरकाप उडवणारा Video व्हायरल

कल्याणमधील सहजानंद चौकात भले मोठे होर्डिंग कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत होर्डिंग खाली उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले, तर दोन जण किरकोळ जखमी असल्याचे माहिती आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

सहजानंद चौक हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. 24 तास या रस्त्यावर वर्दळ असते. याच रस्त्यावर सकाळी रहदारीच्या वेळेस हे भले मोठे होर्डिंग कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. होर्डिंग बाजूला करण्यास आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना संतप्त नागरिकांनी घेराव घालत होर्डिंगवर कारवाई कधी होणार असा सवाल केला.

घाटकोपरमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने अनधिकृत व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर तरी महापालिका धोकादायक अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करेल का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.