लोकसभेला भाजपच्या खुर्चीला आग लावणाऱ्या ‘मशाल’ चिन्हावरच निवडणूक लढवणार! संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मशाल चिन्हावरच महाराष्ट्र आणि देशातील सर्व निवडणुका लढेल. या मशाल चिन्हानेच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

मशाल चिन्हानेच सगळ्यांचा पराभव केला. मशाल, तुतारी वाजवणारा माणूस ही आमची चिन्ह असून सोबत काँग्रेसचा हातही आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढू. पण शिवसेनेचे चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे. धनुष्यबाण हा चोरांच्या हातात आहे. धनुष्यबाणाच्या नावावरती त्यांनी लोकसभेत काही चोऱ्या केल्या, पण विधानसभेला ते जमणार नाही, असा थेट इशाराही राऊत यांनी दिला.

भारतीय जनता पक्ष हिंदू मतांसाठी 36 मतदारसंघात खास रणनिती आखत असल्याबाबत विचारले असता खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत याचा समाचार घेतला. हिंदू मतं… हिंदू मतं… किती काळ करणार? तुम्ही इतकी वर्ष सत्तेत काय करत आहात मग? तुम्हाला आजही हिंदू मतांसाठी योजना, रणनिती आखावी लागते. मग तुम्ही कामं काय केली? असा सवाल करत भाजप हिंदुत्वाचा अजिबात पुरस्कार करत नाही, फक्त राजकारण करते, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

राज्याच्या तिजोरीत खडखडात असून ठेकेदारांचे पैसेही थकले आहेत. तरीही लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना राबवल्या जात आहेत. यावरही राऊत यांनी परखड शब्दात भाष्य केले. ते म्हणाले, हे दोन महिने निवडणुकीचे असून त्यानंतर लाडक्या बहिणींना काहीही मिळणार नाही. लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना लाडक्या बहिणीचा उमाळा फक्त निवडणुकीपुरता आला आहे. दोन महिने खात्यात पैसे टाकतील, महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर करतील आणि पळून जातील, अशी टीकाही राऊत यांनी केली.

केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचं व्यसन

राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत आपल्यावर ईडीची धाड पडणार असल्याचा दावा केला. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते असून ते ज्या पद्धतीने महिन्याभरापासून सरकारवर हल्ला करताहेत, आरसा दाखवताहेत, मोदी-शहांना सळो की पळो करून सोडताहेत त्यामुळे त्यांना आणि आम्हालाही पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागेल. आमची तयारी आहे, पण हे इतके सोपे नाही. कारण आता विरोधी पक्ष मजबूत आहे. मात्र भाजपने लोकसभेत बहुमत गमावले असले तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्याचे त्यांचे व्यसन सुटत नाहीय.’

राहुल गांधींवर ईडीची धाड पडणार? ‘टू इन वन’ला चक्रव्यूहवालं भाषण आवडलं नसल्याचा दावा

दाऊदप्रमाणे दिल्ली, गुजरातमधून महाराष्ट्रातल्या टोळ्या चालतात

अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. हे दोघेही महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य असून त्यांना आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पण म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले होत असतील आणि त्या हल्लांना सरकारचे समर्थन असेल, सरकार मूकदर्शक बनले असेल तर अवघड आहे. राज्यात घटनाबाह्य, गुंडगिरीला पोसणारे सरकार आहे. या गुंडगिरीचे नियंत्रण दिल्ली, गुजरातमधून होत आहे. ज्या पद्धतीने दाऊद इब्राहीम मुंबईतल्या टोळ्या चालवतो, त्याच पद्धतीने हे सरकार टोळी असून याचे प्रमुख दिल्लीत बसले आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केले.