मोखाड्यातील 17 गावांवर यमदूताचा दबा; धोकादायक दरडींमुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवणार

मुसळधार पावसामुळे मोखाड्यातील 17 गावपाडे दरडीच्या छायेखाली असल्याने इर्शाळवाडीसारखी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी डोंगरमाथ्यावर राहणाऱ्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून 17 दरडग्रस्त गावपाड्यांतील ग्रामस्थांच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली असून वेळ पडल्यास त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश मोखाडा तहसीलदारांनी दिले आहेत. यमदूताचा हा दबा दूर होणार तरी केव्हा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

मोखाडा तालुक्यात 13 महसुली गावांमधील सावर्डे, धामणशेत, बेहेटवाटी, पळसपाडा, गायमुखपाडा, रायपाडा, पांडवलेणीचा भाग, आमले, आंब्याची विहीर, नाशेरा, बोरशेती, बिवलपाडा, करोळी, कुडवा, इकरीचापाडा, चिकनपाडा, पांगरी, पासोडीपाडा आणि वांगणपाडा ही गावे डोंगराच्या पायथ्याशी, डोंगर माथ्यावर आणि कपारीत वसलेली आहेत. या गावांवर दरड कोसळण्याची तसेच भूस्खलन होण्याची भीती आहे. त्यामुळे या गावांमध्ये वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची गरज असल्यास त्याची माहिती तहसीलदार कार्यालयाला देण्याचे आदेशदेखील मोखाडा तहसीलदार मयूर खेंगले यांनी गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत.

गावागावात दवंडी
मोखाड्यातील 17 गावपाड्यांमध्ये ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. तर काही ग्रामस्थ शेतीच्या कामासाठी याठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून पाहणी करून माहिती घेणे व सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या ग्रामस्थांनी सतर्क राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गावागावात दवंडी व समाज माध्यमातून सूचित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दरम्यान सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून वेळ पडल्यास ग्रामस्थांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तहसीलदार मयूर खेंगले यांनी सांगितले.