
टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या डंपरला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने मागून धडक दिली. याचदरम्यान त्या टेम्पोची दुचाकीलाही धडक बसून झालेल्या विचित्र अपघातात बाळकुम येथील रहिवासी दुचाकीस्वार वैभव डावखर (वय – 27) याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, या अपघातात टेम्पो चालक धर्मेंद्र यादव (वय – 40) आणि ब्ल्यू डार्ट कंपनीचे सुरक्षारक्षक सुनील बाकरे (वय – 38) असे दोघे जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्युपीटर रुग्णालय परिसरामध्ये हा अपघात झाला आहे. टायर पंक्चर झाल्याने चालकाने ट्रक रस्त्यात उभा केला होता. पहाटेची वेळ असल्याने टेम्पो चालकाला अंदाज आला नाही आणि भरधाव वेगातील टेम्पो ट्रकला धडकला. यावेळी मागून वेगाने येणारी दुचाकी टेम्पोवर आदळली. यात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.