शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घ्या; अन्यथा जेल भरो, सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांचा इशारा

पोलिसांची परवानगी घेऊन निषेध आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांवर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत व या प्रकरणातील प्रमुख मध्यस्थ जनस्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची चौकशी करून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा; अन्यथा सोमवारपासून मिरज ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी आज पत्रकार बैठकीत दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना अटक करावी, यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रचलेल्या षडयंत्रात त्यांचा साथीदार म्हणून जनसुराज्य पक्षाच्या युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष मिरजेचे समित कदम हे अनेकवेळा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले. ऍफिडेव्हिटवर सही करावी, अशी विनंती केल्याचा गौप्यस्फोट खुद्द माजी गृहमंत्री देशमुख यांनी केल्याने शिवसैनिक संतप्त बनले आहेत. समित कदम यांच्यावर गुन्हा करावा, या मागणीसाठी मिरजेत शिवसैनिकांनी पोलिसांच्या परवानगीने आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान समित कदम यांनी पठाण यांच्या मोबाईलवरून शिवसेना मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे यांना धमकी दिली. त्यामुळे समित कदमवर गुन्हा दाखल करावा. यासाठी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. मात्र, कोणतीही नोटीस न देता शिवसैनिकांवर मिरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात विभुते यांनी पत्रकार परिषद घेऊन समित कदमवर गुन्हा दाखल करण्याची आणि शिवसैनिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

जिल्हा संघटक बजरंग पाटील, दिगंबर जाधव, सिद्धार्थ जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, तालुकाप्रमुख विशालसिंग रजपूत, संजय काटे, शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, महादेव हुल्वान, किरण कांबळे, बबन कोळी, आनंद रजपूत, तमन्ना सत्तारमेकर, प्रशांत मोतुगडे, युवा सेनेचे ओंकार जोशी यावेळी उपस्थित होते.