राहुल गांधींवर ईडीची धाड पडणार? ‘टू इन वन’ला चक्रव्यूहवालं भाषण आवडलं नसल्याचा दावा

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक ट्विट करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. संसदेतील भाषणानंतर आपल्या घरावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी धाड टाकण्याच्या तयारीत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ईडीतील आतल्या लोकांनी ही माहिती आपल्याला दिल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “संसदेतील माझे चक्रव्यूहवाले भाषण ‘टू इन वन’ला आवडलेले दिसत नाही, हे स्पष्ट दिसतेय. माझ्यावर धाड टाकण्याची तयारी सुरू असल्याची माहिती ईडीतील आतल्या लोकांनी दिली आहे. मी चहा आणि बिस्किट घेऊन, दोन्ही हात पसरून त्यांची वाट पाहतोय.” या पोस्टमध्ये त्यांनी कोणाचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच असल्याची चर्चा सुरू आहे.

राहुल गांधींचं आक्रमक भाषण

राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनादरम्यान आक्रमक भाषण केले. देश कमळाच्या रुपातल्या चक्रव्युहात अडकला आहे. सहा जण हे चक्रव्युहाच्या केंद्रस्थानी आहे असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात सहा जणांनी अभिमन्यूला चक्रव्युहात अडकवले होते. चक्रव्युहला पद्मव्युहसुद्धा म्हणतात. त्याचा अर्थ कमळ असाही होतो. 21 व्या शतकात एक नवे चक्रव्यूह निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी आपल्या छातीवर कमळाचे चिन्ह मिरवतात. जे अभिमन्यूसोबत झालं ते आता देशाच्या तरुणांसोबत, शेतकऱ्यांसोबत, महिलांसोबत आणि छोट्या-मध्यम व्यापाऱ्यांसोबत होत आहे. आजचे हे चक्रव्यूह सहा लोकांकडून नियंत्रित केले जात आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी ही लोकं चक्रव्यूह नियंत्रित करतात असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

दरम्यान, संसदेतील याच आक्रमक भाषणानंतर राहुल गांधी यांच्या भाजप नेत्यांनी हल्ला चढवला होता. याच भाषणामुळे आपल्यावर ईडीद्वारे धाड टाकण्याचे नियोजन सुरू असत्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. यामुळे दिल्लीतील राजकारण तापले आहे.