इस्रायलवर हल्ला करण्याची इराणची तयारी, अयातुल्ला खमेनी यांनी दिले आदेश

हमासचे राजकीय नेते इस्माईल हानिये यांची तेहरानमध्ये हत्या झाल्यावर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. खमेनी यांनी बुधवारी सकाळी इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत हा आदेश दिला असे समजते.

न्यूयॉर्प टाइम्सने तीन इराणी अधिकाऱयांचा हवाला देऊन या आदेशाची माहिती दिली. यापैकी दोन अधिकारी रिव्होल्युशनरी गार्डस् सैन्यदलाचा भाग आहेत. इराण आणि हमासने या हत्येचा ठपका इस्रायलवर ठेवला आहे. मात्र, तेहरानमध्ये असलेल्या हानियेची हत्या केल्याचा स्वीकार किंवा इन्कारही इस्रायलने केलेला नाही.

खमेनी यांच्या आदेशानुसार इराणने इस्रायलवर थेट हल्ला चढवल्यास युद्धाचा जबरदस्त भडका उडू शकतो. हा भडका टाळण्यासाठी इराण मर्यादित, पण तीव्र हल्ला करण्याची शक्यता आहे. नागरी वस्त्या आणि वसाहती टाळण्याच्या सूचना खमेनी यांनी लष्कराला केल्या असल्याचे समजते.

इस्रायलने हमासचा सैन्य प्रमुखही उडवला

हमासचे राजकीय नेते हनिये यांना तेहरानमध्ये टिपल्यानंतर इस्रायलने गाझाचा ‘लादेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया मोहम्मद दाईफलाही उडवल्याचे जाहीर केले. खान युनिस येथे 13 जुलै रोजी लढाऊ विमानाने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाल्याचे इस्रायलने जाहीर केले. हमासच्या लष्करी विभागाचा प्रमुख असलेल्या दाईफनेच इस्रायलवरील हल्ल्यात मुख्य भूमिका बजावली होती. अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीतही दाईफ होता. हमासमध्ये आता फक्त याह्या सिनवार हाच मोठा नेता राहिला आहे.