नव्या संसद भवनाला गळती, बाराशे कोटी खर्च झाला असल्याने दर्जावर प्रश्नचिन्ह

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले असताना आता नव्याकोऱया संसद भवनालाही गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे तब्बल बाराशे कोटी खर्च करून बांधलेल्या संसद भवनाच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. नवी संसद भवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याची जाहिरातबाजी भाजपकडून करण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी आता सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते मे 2023मध्ये झालेल्या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वगळल्याने मोठा वादही निर्माण झाला होता.

पावसामुळे संसदेचे छत गळू लागले आहे. यामुळे संसद भवनात अनेक ठिकाणी प्लॅस्टिकची भांडी ठेवण्याची वेळ आली आहे. याबाबतचा व्हिडीओ समाजवादीचे अखिलेश यादव यांनी ट्विट केला आहे. जोरदार पावसामुळे संसद भवन संपुलातही पाणी साचले. या प्रकारावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. या गळतीबाबत अखिलेश यादव म्हणाले आहेत की, ‘या नव्या संसदेपेक्षा जुनी संसद चांगली होती. जिथे जुने खासदारही येऊन भेटू शकत होते. त्यामुळे पुन्हा या संसदेत जाण्यास हरकत नाही. तोपर्यंत कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या या संसदेतील पाणीही वाहून जाईल. भाजपच्या कार्यकाळात प्रत्येक छतावरून टपकणारे पाणी म्हणजेच विकास आहे का?’ काँग्रेसचे खासदार मणिकम टागोर यांनीही संसदेच्या गळतीवरून सरकारला टोला लगावला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सचिवालय म्हणते

हरित संसदेची संकल्पना लक्षात घेऊन संसद भवनाच्या अनेक भागांत काचेचे घुमट बसवण्यात आले आहेत, जेणेकरून नैसर्गिक प्रकाश येऊ शकेल. यामध्ये लॉबीचाही समावेश आहे. बुधवारी मुसळधार पावसामुळे काचेच्या डोमला सील करण्यासाठी लावलेले साहित्य काढून टाकण्यात आले. त्यामुळे ही गळती झाली.

कामात कमिशनबाजी झाल्याने तकलादू काम

मोठा गाजावाजा करीत कमिशनबाजीने तकलादू काम झाल्यामुळेच संसद भवनात गळती झाली असून जागोजागी बादल्या लावाव्या लागल्या. संसदेची ऐतिहासिक इमारत उभी असताना फक्त अहंकार आणि हट्टापायी नवी इमारत उभी करण्यात आली. आजही तिथे खासदार गुदमरलेल्या अवस्थेत काम करतात, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. अयोद्धेमधील राम मंदिरालाही गळती लागली. तेही काम नीट झाले नाही. आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना हजारो, लाखो कोटींची कामे द्यायची आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे लोण आता रस्ते-पुलांनंतर थेट संसदेच्या इमारतीपर्यंत पोहोचले असेल तर राष्ट्रीय अस्मिता पुठे शिल्लकच राहिली नाही, असेही ते म्हणाले.