वायनाडमधील मृतांचा आकडा 291 वर! 200 बेपत्ता, हृदय विदीर्ण झाले; राहुल गांधी यांनी व्यक्त केली वेदना

भूस्खलनामुळे जणू आभाळच कोसळलेल्या वायनाडवासीयांचा आक्रोश, दुःख एक वेदनादायक अनुभव आहे. त्यांच्या सांत्वनासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. वायनाड, केरळ आणि देशासाठीही ही एक भीषण शोकांतिका असून खरोखरीची राष्ट्रीय आपत्ती आहे, अशा भावना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आपत्तीग्रस्तांशी संवाद साधताना व्यक्त केल्या.  माझ्या वडिलांचे निधन झाल्यावर मला जे दुःख झालं होतं तसंच दुःख मी आज इथला विनाश आणि वाताहात पाहून अनुभवतो आहे, असे ते म्हणाले. इथल्या लोकांनी केवळ वडिलच नाही तर संपूर्ण कुटुंबच गमावली आहेत. दरम्यान, या भीषण आपत्तीत आतापर्यंत एपूण 291 जण मृत्युमुखी पडले असून 200 हून अधिक जखमी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

वायनाडचे माजी खासदार असलेले राहुल गांधी आज सकाळी प्रियंका गांधी यांच्यासमवेत येथे दाखल झाले. या भीषण भूस्खलनात ज्यांनी कुटुंबीय आणि घरे गमावली आहेत त्यांचे अतिव दुःख पाहावत नाही. माझ्या मते, ही निश्चितपणे राष्ट्रीय आपत्ती आहे, परंतु सरकार काय म्हणते ते पाहूया, असे मत त्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केले.

वायनाडच्या भूस्खलनामुळे चार गावे चिखलमातीच्या ढिगांखाली नाहिशी झाली आहेत. सर्व परिसरात चिखल, दलदल, पाणी, वाहून आलेली झाडे, मोठाले दगड पसरले आहेत. या गावांपैकी चूरलमला भागाला राहुल आणि प्रियंका यांनी भेट दिली. इथला विनाश पाहाणे, कुटुंबीय आणि घरदार गमावलेल्या लोकांशी बोलणे हा खूपच दुःखदायक अनुभव आहे. या लोकांशी अशा परिस्थितीत काही बोलणेही खूप कठीण आहे कारण, त्यांच्याशी काय बोलायचे, कसे सांत्वन करायचे हेच तुम्हाला कळत नाही, असे ते म्हणाले.

वाचवायला आता कुणी राहिलेलेच नाही

गेल्या तीन दिवसांत जे जिवंत आहेत त्यांना वाचवण्यात आले आहे. आता त्या चिखल, दलदलीत वाचवायला कुणी राहिलेलेच नाही, असे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी वायनाडमधील कलपेट्टा येथे आढावा बैठकीनंतर म्हटले आहे. यामुळे मृतांची संख्या 300 च्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. मुंडक्काई, चूरलमला आणि अट्टमला या गावांमध्ये कोणीही वाचलेले नाही, असे आता गृहीत धरायला लागेल. या परिसरातून फक्त मृतदेह बाहेर काढणे बाकी आहे. या भागातील दोन शाळांमधून 29 शाळकरी मुले बेपत्ता आहेत, असे त्यांनी सांगितले.

आम्ही वायनाडवासीयांबरोबर

इथला विनाश आणि आपत्ती पाहून माझे हृदय विदीर्ण झाले आहे. या कठीण काळात, प्रियांका आणि मी वायनाडच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. आम्ही मदत, बचाव आणि पुनर्वसन कार्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत पुरविली जाईल याची खात्री करून घेत आहोत. भूस्खलनाच्या आणि नैसर्गिक आपत्तींच्या वारंवार घडणाऱया घटना अत्यंत चिंताजनक आहेत. या संकटांचा सामना करण्यासाठी एका सर्वसमावेशक पृती आराखडय़ाची तातडीने गरज आहे, असे राहुल यांनी फेसबुक वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सर्व नुकसानभरपाई मिळवून देणार

निसर्गाचे हे तांडव दाखवणारा आजचा दिवस माझ्यासाठी खूपच अस्वस्थ करणारा आहे. मात्र, या संकटातून वाचलेल्यांना त्यांना देय असलेली सर्व भरपाई नक्की मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न आणि मदत करणार आहोत, असे राहुल यांनी सांगितले.

रुग्णालय, मदत छावण्यांना भेट

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी चूरलमला येथील भूस्खलनग्रस्त भाग, मेपाडी येथील डॉ. मूपेन्स रुग्णालय आणि सामुदायिक आरोग्य केंद्र येथील दोन मदत शिबिरांना भेट देत आपत्तीग्रस्तांचे सांत्वन केले. पावसाची पर्वा न करता चिखलाने भरलेल्या या भागात पाहाणी करताना त्यांनी बेली ब्रिजची उभारणीही पाहिली.