जगभरातून महत्वाच्या बातम्या

रशिया-युक्रेन युद्ध नव्या वळणावर

रशिया आणि युक्रेन यांच्यातील लढाई आता नव्या वळणावर पोहोचली आहे. रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनच्या मदतीला अमेरिका पुन्हा एकदा धावून गेली आहे. अमेरिकेने युक्रेनला पहिले एफ-16 लढाऊ विमान सोपवले आहे. युक्रेनची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर अमेरिकेने पूर्ण केली आहे. एफ-16 या लढाऊ विमानाचा युक्रेन आता रशियाविरुद्धच्या युद्धात वापर करणार आहे. रशियाकडून होत असलेल्या क्षेपणास्त्रांचा मारा रोखण्यासाठी एफ-16 लढाऊ विमानाचा वापर करणार आहेत. या लढाऊ विमानामुळे या दोन देशांतील युद्ध आता नव्या वळणावर पोहोचल्याचे पश्चिम देशांनी म्हटले आहे. अमेरिका युक्रेनच्या पायलट यांना या लढाऊ विमानाचे उड्डाण कसे करावे याचे प्रशिक्षणसुद्धा देत आहे.

यूपीआयवरच्या व्यवहारात 45 टक्क्यांची वाढ

 

जुलै महिन्यात युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयवरून तब्बल 1444 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. अवघ्या 30 दिवसात 2 हजार 64 कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे, अशी माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय), यूपीआयचे नियमन करणाऱया संस्थेने आज गुरुवारी या व्यवहाराची आकडेवारी जाहीर केली. गेल्यावर्षीच्या जुलै महिन्यांच्या तुलनेत हा व्यवहार 45 टक्क्यांनी वाढला आहे.

तापसी पन्नूने डेन्मार्कमध्ये खरेदी केले नवे घर

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि तिचा पती मैथियास यांनी डेन्मार्कमध्ये घर खरेदी केले. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये तापसीने ही माहिती दिली. आम्ही डेन्मार्कमध्ये एक घर खरेदी केले. आम्ही दोघेही या ठिकाणी ये-जा करत जाऊ. आम्ही या ठिकाणी जास्त दिवसांसाठी राहू शकणार नाही. कारण, मैथियास एक खेळाडू आहे. तर मी अभिनेत्री आहे. त्यामुळे आम्हाला सतत बाहेर राहावे लागते. परंतु, आम्ही दोघेही उन्हाळ्याच्या सुट्टीत या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू असे तापसीने म्हटले.

इन्फोसिस कंपनीला करचोरीप्रकरणी नोटीस

इन्फोसिस टेक्नोलॉजी कंपनीला 32 हजार कोटी रुपयांच्या करचोरी केल्याप्रकरणी जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने नोटीस पाठवली आहे. इन्फोसिसवर वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी सिस्टिममध्ये रिव्हर्स चार्ज मेपॅनिझम अंतर्गत कर चुकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. कथित करचोरी ही जुलै 2017 ते 2021-22 या कालावधीतील असून ही रक्कम 32 हजार 40.3.46 कोटी रुपये इतकी आहे. इन्फोसिसने कंपनीच्या परदेशातील शाखांनी केलेल्या खर्चाचा हिंदुस्थानातून त्यांच्या निर्यात चलनांमध्ये समावेश केला आहे, असेही या नोटिसीत म्हटले आहे.

7 कोटी करदात्यांनी भरले आयटीआर

इन्कम टॅक्स भरण्यासाठीची डेडलाईन 31 जुलै 2024 होती. ही डेडलाईन बुधवारी संपली. देशभरात 7 कोटी लोकांनी आयटीआर फाईल भरली, अशी माहिती आयकर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दिली. या 7 कोटीमध्ये शेवटच्या दिवशी 50 लाखांहून जास्त आयटीआर दाखल झाल्याचेही आयकर विभागाने सांगितले. गेल्या वर्षी 6.77 कोटी हून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले होते. डेडलाईन संपली असली तरी टॅक्सपेयर्स दंड भरून 31 डिसेंबरपर्यंत आयकर रिटर्न फाईल करू शकतील.