हिमाचलमध्ये ढगफुटी, पुरामुळे हाहाकार

हिमाचल प्रदेश राज्यात पाच ठिकाणी ढगफुटी झाली. यात 50 हून अधिक जण बेपत्ता झाले असून आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह हाती आले आहेत. ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून पुरामुळे हाहाकार उडाला आहे. राज्यातील शेकडो घरांना याचा जबर फटका बसला. पुल्लुमधील सर्व शाळा 2 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सुखविंद्र सिंह सुक्खु यांनी तातडीची बैठक बोलावली असून अधिकाऱयांना मदत करण्याच्या योग्य त्या सूचना दिल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंडी आणि शिमला या ठिकाणी ढगफुटी झाली आहे, अशी माहिती हिमाचल प्रदेश प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे दोन पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. पुल्लूत बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रामपूर या ठिकाणीही ढगफुटी झाली आहे. शिमला-कुल्लू सिमेवर ढगफुटी झाल्याने अनेक घरे पाण्यात वाहून गेली आहेत. शाळा-कॉलेजेसना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.