Pune News – अंगावर लोखंडी गेट पडल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू, पिंपरी-चिंचवडमधील दुर्दैवी घटना

घराबाहेर खेळत असताना लोखंडी गेट अंगावर पडल्याने साडे तीन वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरातील गणेशनगरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा शिंदे असे मयत चिमुरडीचे नाव आहे.

‘टाईम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, मयत चिमुरडी इतर तीन मुलांसोबत बुधवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. गिरीजा एका मुलीचा हात पकडून इकडून तिकडे धावत होती. तर एक मुलगा सायकल चालवत तर दुसरा गेटजवळ होता.

गेटजवळ खेळत असलेल्या मुलाने सायकल चालवण्याऱ्या मुलासाठी गेट पूर्ण उघडला. त्यानंतर सायकल चालवणारा मुलगा आत गेला. यानंतर मुलगा पुन्हा गेट लावत होता. मात्र गेट पूर्ण ओढल्यानंतर अचानक कोसळला. याच दरम्यान गिरीजा दुसऱ्या मुलीसोबत पुन्हा तिथे धावत आली आणि गेटखाली दबली.

लोखंडी गेट गिरीजाच्या अंगावर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या गिरीजाला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.