
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आजचा दिवस हिंदुस्थानासाठी विशेष ठरला. मराठमोळ्या कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेने कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानचा तिरंगा ऑलिम्पिकमध्ये उंचावला. त्यामुळे महाराष्ट्रासहीत देशभरामध्ये स्पप्निलच्या विजयाचा आनंद साजरा केला जात आहे. अशातच बॅडमिंटनमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लक्ष्य सेनने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत आपल्याच साथीदाराचा पराभव केला आणि क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.
हिंदुस्थानचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेनचा प्री क्वार्टर फायनल सामना हिंदुस्थानच्याच एच.एस.प्रणॉयविरुद्ध रंगला. बॅडमिंटनमध्ये इंडियाचेच दोन्ही खेळाडू आमने सामने येण्याचा असा प्रसंग ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. दोन्ही इंडियाचे खेळाडू असल्यामुळे प्रेक्षकांकडून दोघांच्याही खेळीला दाद मिळत होती. मात्र प्रशिक्षकांना कोणाला मार्गदर्शन करावे याचे कोडे पडले असावे आणि त्यामुळे त्यांनी सामन्याला न येण्याचा निर्णय घेतला असावा. कारण बॅडमिंटन कोर्टच्या बाजूला प्रशिक्षकांसाठी राखीव असणारी जागा रिकामी होती.
या सामन्यामध्ये लक्ष्य सेनने सुरुवातीपासूनच चांगला खेळ करत सामन्यावर पकड निर्माण केली. प्रणॉयने सुद्धा दमखम धाकवत कडवी झुंज दिली, मात्र तो अपयशी ठरला. लक्ष्य सेनने दोन्ही गेम 21-12 आणि 21-6 अशा फरकाने जिंकले. विजयानंतर मात्र लक्ष्य सेनने जल्लोष न करता फक्त प्रेक्षकांना अभिवादन केले आणि आपला साथीदार एच.एस.प्रणॉयला मिठी मारली.