
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पुरुषांच्या पात्रता फेरीत 590 गुणांसह सातव्या स्थानावर पोहोचलेल्या मराठमोळा नेमबाज स्वप्निल कुसाळे याने आज अंतिम फेरीत इतिहास रचला. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग पाठोपाठ स्वप्निल कुसाळे याने हिंदुस्थानला नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्रता फेरीत थोडक्यात संधी हुकलेल्या कोल्हापूरच्या या पठ्ठ्याने आता पॅरीस ऑलिम्पिकमध्ये पदकाची ही कसर भरुन काढत सर्वांचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्या या यशाचा डंका जगभर गाजत आहे.
View this post on Instagram
ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक पदक जिंकणारा स्वप्निल कुसाळे पहिला खेळाडू ठरला. खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेसलिंकी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदक जिंकले होते. त्यांच्यानंतर आता स्वप्निल कुसाळे या मराठमोळ्या खेळाडूने कोल्हापूरची मान उंचावली आहे. यापूर्वी कोल्हापूरचीच आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत आणि राही सरनोबत यांची संधी थोडक्यात हुकली होती. पण स्वप्निल कुसाळे याच्या या ऐतिहासिक यशाने राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या त्याच्या छोट्या गावासह अवघ्या कोल्हापुरात जल्लोष होत असून त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी संघात निवड झालेला स्वप्निल हा महाराष्ट्रातील एकमेव नेमबाज आहे. सध्या रेल्वेत टीसी म्हणून तो कार्यरत आहे.
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या छोट्या खेड्यात जन्मलेल्या स्वप्निलने सन 2009 मध्ये नेमबाजीला सुरुवात केली. शिक्षक असलेल्या वडिलांनी बँकेकडून कर्ज काढून त्याच्या या महागड्या खेळाला प्रोत्साहन दिले. सरावासाठी त्याला पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत दाखल केले. सुरुवातीच्या काळात त्याला नेमबाजीसाठी लागणाऱ्या गोळ्या घेण्यासाठी अडचणी येत असल्याने त्याच्या सरावावर मर्यादा येत होत्या.प ण या सर्व अडचणीवर मात करत स्वप्निलने आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.
सन 2015 मध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कनिष्ठ गटात त्याने सुवर्णपदक पटकाविले. 59 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंग व चेनसिंग या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत विजेतेपद पटकावले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून आत्मविश्वास बळवलेल्या स्वप्नीलने सन 2022 मध्ये इजिप्तच्या कैरो येथे झालेल्या स्पर्धेत 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात चौथा क्रमांक पटकावला. येथेच पॅरीस ऑलिम्पिकचा कोटा मिळवत त्याने यशाला गवसणी घालत आपले ध्येय तर मिळविलेच शिवाय सर्व देशवासीयांची अपेक्षाही या पदकातून साध्य केली.
नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये इयत्ता नववीत असताना स्वप्निलने पहिले राज्यस्तरीय सुवर्णपदक जिंकले होते. तेव्हाच ऑलिम्पिक पदक मिळवण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्याने इयत्ता आठवीच्या उन्हाळी सुट्टी पासून घेतलेली मेहनत आता कामी आली आहे. देशवासीयांच्या शुभेच्छा आणि पाठबळा मुळे स्वप्निलने देशासाठी या पदकाला गवसणी घालून हिंदुस्थानासह आपल्या महाराष्ट्राचे आणि कोल्हापूरचे तसेच आपल्या कांबळवाडी या गावाचेही नाव उंचावल्याचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वप्नीलचे वडील आणि कौलव केंद्र शाळेचे प्रमुख सुरेश कुसाळे तसेच आई कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच अनिता कुसाळे यांनी व्यक्त केली.
सतेज पाटील यांच्याकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर
पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर एअर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात कोल्हापूरच्या स्वप्निल सुरेश कुसाळे याने कांस्यपदक मिळविल्याबद्दल त्यांचे आमदार सतेज पाटील तसेच आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिनंदन केले. स्वप्नीलच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. स्वप्नीलला 2021 मध्ये आम्ही ब्रँड कोल्हापूर म्हणून सन्मानित केले होते अशी माहिती आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी दिली.
Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था