कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेची धोनीसारखीच स्टोरी; स्वत: मध्य रेल्वेत टीसी, वडील-भाऊ शिक्षक अन् आई सरपंच

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एक पदक आले. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन ईव्हेंटमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्यपदक जिंकत इतिहास रचला. ऑलिम्पिक इतिहासामध्ये या प्रकारात पदक जिंकणारा स्वप्निल पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत हिंदुस्थानने आतापर्यंत तीन पदकं जिंकली असून तिन्ही पदकं नेमबाजीत आलेली आहेत.

कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या 29 वर्षीय स्वप्निलची स्टोरीही टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि वर्ल्डकप विजेता कर्णधार महेंद्रसिंह धोनी सारखी आहे. धोनीप्रमाणे स्वप्निलही मध्य रेल्वेमध्ये तिकीट कंडक्टर आहे. धोनीही सुरुवातीला रेल्वेमध्ये तिकीट कंडक्टर होता.

स्वप्निलने 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यास सुरुवात केली. मात्र ऑलम्पिकमध्ये पदार्पण करण्यासाठी त्याला एक तप वाट पहावी लागली. धोनीला आदर्श मानणाऱ्या स्वप्निलने त्याच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे. धोनीच्या व्यक्तीमत्त्वाचा आपल्यावर प्रभाव असल्याचे स्वप्निल सांगतो.

एका मुलाखतीमध्ये स्वप्निलने सांगितले होते की, नेमबाजीसाठी मी कोणत्याही खास खेळाडूचे मार्गदर्शन घेत नाही. परंतु धोनी माझा आवडता खेळाडू आहे. धोनीला कॅप्टन कूल म्हणून ओळखले जाते. मैदानात थंड डोक्याने डावपेच रचण्यात त्याचा हातखंडा आहे. त्याच्याप्रमाणे नेमबाजीतही चित्त शांत राखण्याची आवश्यकता असते. धोनीही टीसी होता आणि मी देखील आहे.

Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था

स्वप्निल कुसाळेने 2015 पासून मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहे. त्याचे वडील आणि भाऊ शिक्षक असून त्याची आई गावाची सरपंच आहे. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी वडिलांनी त्याला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले. तिथून त्याचा प्रवास सुरू झाला. नेमबाजीतील कौशल्य विकसित करण्यासाठी पुण्याला जाण्यापूर्वी त्याने नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतले.

मोदींनी केलं अभिनंदन

दरम्यान, स्वप्निल कुसाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वप्निल कुसाळे याचे अभिनंदन केले आहे. यासह अभिनव बिंद्रा यानेही त्याचे कौतुक केले आहे.