संसदेच्या नव्या इमारतीला गळती; संजय राऊत यांनी मोदी सरकारला धू धू धुतले

मोठा गाजावाजा करत उभारण्यात आलेल्या संसदेच्या नव्या इमारतीला गळती लागली आहे. पाण्याची धार अडवण्यासाठी खाली बादल्या लावाव्या लागत असून संसद परिसरामध्ये पाण्याचा डोह साचला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारची धुलाई केली.

अल्पकाळामध्ये किती तकलादू काम झालेले आहे आणि किती मोठी कमीशनबाजी झाली हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग, अटल सेतूतही भ्रष्टाचार झाला. त्यामुळे संसदेत गळती लागली किंवा संसदेच्या पायऱ्यापर्यंत पाणी पोहोचले तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. संसदेची ऐतिहासिक इमारत उभी असताना फक्त अहंकार आणि हट्टापायी नवी इमारत उभी केली. आजही तिथे खासदार गुदमरलेल्या अवस्थेत काम करतात, असे खासदार राऊत म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिरालाही गळती लागली. तेही काम निट झाले नाही. आपापल्या ठेकेदारांना हजारो, लाखो कोटींची कामं द्यायची आणि निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. हे लोण रस्ते आणि पुलांपर्यंतच नाही तर संसदेच्या इमारतीपर्यंत पोहोचले असेल तर देशाची राष्ट्रीय अस्मिता कुठे शिल्लकच नाही राहिली. यावर प्रश्न विचारला तर तो राष्ट्रद्रोही ठरवला जातो. त्याचा संसदेतून बडतर्फ केले जाते. खटले दाखल केले जातात. संसदेचे अधिवेशन सुरू असताना अशी परिस्थिती असेल तर त्याच्यावर जनतेच्या मनात प्रश्न उपस्थित होऊ नयेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

आमच्या नादी लागून दाखवाच! संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

मुंबईची अवस्था पहा. महानगर पालिकेमध्ये लोकनियुक्त नगरसेवकांचे राज्य नसल्याने मुंबईचे रस्ते आणि नागरी सेवेची दुर्दशा झाली आहे. दिल्लीत गृहमंत्रालयाचे प्रतिनिधी नायब राज्यपालांच्या हातात सत्ता आहे. केजरीवाल मुख्यमंत्री असले तरी त्यांना तुरुंगात टाकले असून मंत्र्यांनाही काम करू देत नाहीत. नायब राज्यपालांच्या माध्यमातून दिल्ली चालवली जात असून दिल्लीची अवस्थाही बिकट झालेली आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

जाब विचारण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांनाच आहे. हे सगळे ते सत्तेत असल्यामुळे नाही तर आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे घडत आहे. आम्हालाच प्रश्न विचारले जातील. आम्ही प्रश्न विचारले तर गुन्हेगार ठरू. बुधवारी संसदेत समाजवादी पार्टीचे रामजीलाल सुमन यांनी एक प्रश्न विचारला की, राष्ट्रीय परीक्षा संस्था, जी नीट सारख्या परीक्षांचे नियोजन करते यासारख्या अनेक संस्थांवर जे प्रमुख नेमले त्यांची पात्रता काय? संघाशी संबंधित असणाऱ्या व्यक्तीलाच तिथे नेमले जाते का? यावरून संसदेत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. त्या संस्थेचे प्रमुखांचा पूर्वइतिहास पहा. व्यापम घोटाळ्यासह अनेक घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. अशी व्यक्ती राष्ट्रीय परीक्षा संस्थेची प्रमुख होते. नीटचा बोझवारा त्यांच्यामुळेच उडालेला. डीआरडीओ, पुणेच्या प्रदीप कुरुडकर यांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करताना अटक केली आहे. त्याच्यावर प्रश्न विचारायचे नाहीत. कारण उपराष्ट्रपतींना वाटते की संघाचे योगदान देशकार्यात मोठे आहे. हे त्यांचे योगदान आहे, असा टोलाही राऊत यांनी केला.