आमच्या नादी लागून दाखवाच! संजय राऊत यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान

माझ्या नादी लागणाऱ्याला सोडत नाही म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. तुम्हाला कुणी म्हटलं आमच्या नादी लागू नका? आमच्या नादी लागून दाखवाच, असे थेट आव्हान खासदार राऊत यांनी फडणवीस यांना दिले. गुरुवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले.

नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलीस, ईडी किंवा सीबीआयच्या लोकांना आमच्या मागे लावणार. नादी लागण्याचा विचार करत असाल तर तुरुंगात असणारा ईडीचा एजंट रोमी भगत कुणाचा माणूस आहे आणि त्या माध्यमातून हजारो कोटी रुपये गोळा कुणी केले हे सांगा. नादी लागणारच असाल तर आमचे आव्हान आहे. आमच्या नादी लागूनच दाखवा. लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात, आम्ही तुमचा नाद उतरवला. त्यामुळे ही बोलकी पोपटगिरी बंद करा, असा टोलाही राऊत यांनी लगावला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जे आव्हान दिले आहे ते एका मर्द मराठ्याचे, महाराष्ट्रप्रेमीचे आणि महाराष्ट्रस्वाभिमानीचे आव्हान आहे. फडणवीस आणि त्यांच्या टोळीची नादी लागण्याची हिंमत आणि छाती नाही. ईडी, सीबीआय, पोलीस ही सगळी कवच कुंडले काढा आणि मैदानात उतरा, असे आव्हानही खासदार राऊत यांनी दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आक्रमक भाषण केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही, तर तलवार उपसली आणि घाव घातला. देवेंद्र फडणवीस हे संघ विचारांचे आहेत. या संघ विचाराच्या माणसाने कोणती संस्कृती, निती, नियम महाराष्ट्रात पाळले? त्यामुळे जे संघाला सुसंस्कृत, प्रखर राष्ट्रवान आणि नितीमान मानतात त्यांना मी फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती अनितीमान, असंस्कारी, भ्रष्ट आणि क्रूर असू शकतो. कपट, कारस्थानी संघाचा फडणवीस हा चेहरा आहे. अशा लोकांमुळेच संघ बदनाम झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी तुम्ही नाही तर तू हा शब्द वापरला. पुन्हा येईन… पुन्हा येईन… जसे हवेत विरून गेले तसेच तुम्ही जाणार आणि आम्हीच राहणार आहोत, असा घणाघात राऊत यांनी चढवला.

एक तर तू राहशील नाही तर मी! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा

महाराष्ट्राची अवस्था बिकट, फडणवीस जबाबदार

देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा भाजप व संघ विचारांशी काही संबंध नाही. संघाला फार मोठी परंपरा आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्यांच्या टोळ्या घेऊन दळभद्री, घाणेरडे, गटारी पद्धतीचे राजकारण केले त्याचे परिणाम आज महाराष्ट्र भोगतोय. महाराष्ट्राची अवस्था बिकट झाली आहे. याला फडणवीस जबाबदार आहे. महाराष्ट्राच्या मातीत ढोंग, कपट, कारस्थान, विचारांची शुद्रता कधी रुजली नव्हती. महाराष्ट्रासाठी आम्ही सर्व एकत्र होतो. एकमेकांच्या कुटुंबापर्यंत, मुलाबाळापर्यंत सरकार किंवा पोलिसांचे हात पोहोचले नाहीत ही राज्याची परंपरा आहे, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मार्गावर असून संघाचाही त्याला हिरवा कंदील असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता राऊत यांनी संघाचाही समाचार घेतला. संघ असंस्कारी, असंस्कृत आणि अनितीमान लोकांना पाठीशी घालणारे संघटन झाले आहे. आम्ही बाळासाहेब देवरस, रज्जू भैया यांचा संघ पाहिला आहे. त्यांच्या पायावर आम्ही डोके ठेवले आहे. पण सध्या संविधानाची, देशाच्या लोकशाहीच्या चिंधड्या उडवणारी लोकं सत्तेत बसली असून संघ काय करतोय? असा सवाल करत ज्या संघाचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात एका टिंबाएवढेही योगदान नव्हते, किंबहुणा ज्या संघ विचारांची लोकं ‘चले जाव’ची जवळज चिरडून टाका अशी पत्र ब्रिटिशांना लिहित होते त्यांनी आमच्याशी लढण्याची भाषा करायची नाही, असा इशाराच राऊत यांनी दिला.

मोदी धडपडत जिंकू शकतात, तर फडणवीसही हरू शकतात!

विधानसभेसाठी ताई, माई, अक्का अभियान सुरू करण्याच्या तयारीत असणाऱ्या मिंध्यांचीही राऊत यांनी धुलाई केली. शिवसेनेसारख्या आईच्या पाठीत खंजीर खुपसून ही लोकं राजकारण करत आहेत. त्यांना खंजीर पुरवण्याचे काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले. त्यामुळे महाराष्ट्रा त्यांना शत्रु मानतो, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच हे सरकार औटघटकेचे असून फडणवीस यांचाही विधानसभेत पराभव होत आहे. नागपूर कुणाच्या नावावरील सातबारा नाही. मोदी वाराणसीमध्ये धडपडत जिंकू शकतात, तर फडणवीसही सहज हरू शकतात. ही काय अजिंक्य लोकं आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.