टेलिग्रामचा सीईओ निघाला ‘विकी डोनर’, 12 देशांमध्ये 100 हून अधिक मुलं असल्याचा दावा

तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये वेगवेगळ्या धाटणीचे आणि विषयांवरील शेकडो चित्रपट आपल्याला पहायला मिळतात. यापैकीच एक आयुष्मान खुराना याची प्रमुख भूमिका असणारा ‘विकी डोनर’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेलच. काही कारणास्तव मुलं न होणाऱ्या पालकांसाठी या चित्रपटातील विकी हे पात्र स्पर्म डोनर म्हणून काम करत असते. खरे तर हा सामाजिक विषय, पण याला विनोदाची फोडणी देऊन हा चित्रपट बनवण्यात आला आणि अनेकांच्या मनातही उतरला. लोकांनी याचे तोंड भरून कौतुकही केले. पण आता रियल लाईफमध्येही असा ‘विकी डोनर’ असल्याचे समोर आले असून

टेलिग्राम अॅपचा संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव याने तो दुसरा-तिसरा कुणी नसून आपणच असल्याचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्याने ही माहिती दिली आहे. मला वेगवेगळ्या देशांमध्ये 100 जैविक मुलं आहेत असा दावा त्याने केला आहे. टेलिग्रामच्या 5.7 कोटी युजर्ससोबत त्याने ही माहिती शेअर केली आहे. विशेष म्हणजे 39 वर्षीय पावेल हा अविवाहित आहे.

पावेल दुरोव याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एका मित्राने 15 वर्षांपूर्वी माझ्याकडे विचित्र मागणी केली होती. माझ्या मित्राला आणि पत्नीला काही समस्येमुळे मुलं होत नव्हती. त्यामुळे त्याने मला स्पर्म डोनेट अर्थात विर्यदान करण्यास सांगितले. त्यावेळी मला हसू आवरले नाही, मात्र नंतर मला ही खरंच खुप मोठी समस्या असल्याचे जाणवले.

त्याने मला सांगितले की, मुलं होण्यासाठी ज्या रुग्णालयाशी संपर्क साधला तिथे चांगल्या दर्जाचे शुक्राणुंची वानवा आहे. त्यानंतर माझ्या डॉक्टरांनीही मला विर्यदान करून मुलं नसणाऱ्या जोडप्यांना मदत करू शकतो असे सांगितले. त्यामुळे मी शुक्राणू दान करण्याचा निर्णय घेतला.

शुक्राणू दान करत राहिल्याने सध्याच्या घडीला (2024) जगभरातील 12 देशांमध्ये माझे 100 हून अधिक जैविक मुलं आहेत. मात्र गेल्या काही वर्षापूर्वी आपण शुक्राणू दान करण्याचे थांबवले आहे. मात्र आजही काही रुग्णालयांमध्ये मी दान केलेले शुक्राणू जिवंत असून अनोळखी लोकांसाठी ते उपलब्ध आहेत, असे दुरोव याने म्हटले.

तसेच मला विर्यदान केल्याचा अभिमान आहे. चांगल्या दर्जाच्या शुक्राणुंची वानवा ही जागतिक समस्या आहे. परंतु मी माझी भूमिका निभावली, असेही तो म्हणाला. दुरोव याची ही पोस्ट व्हायरल झाली असून आतापर्यंत 1.8 मिलियन लोकांपर्यंत पोहोचली असून शेकडो लोकांनी ती शेअरही केली आहे. एक्सचे मालक एलन मस्क यांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे.