
>>मंगेश दराडे
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता गोरगरीबांना झटका देण्याच्या तयारीत असून श्रीमंतांसाठी मात्र रेड कार्पेट घातले आहे. म्हाडातर्फे मुंबईतील दोन हजार घरांसाठी पुढच्या आठवड्यात जाहिरात निघणार असून यात गतवर्षीच्या लॉटरीतील शिल्लक घरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील शिल्लक घरांच्या किमती यंदा सव्वाचार लाख रुपयांनी महागणार आहेत तर कन्नमवार नगरमधील अत्यल्प गटाच्या घरांसाठीदेखील लाखभर रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जुहू आणि ताडदेवमधील आलिशान घरांच्या किमती गतवर्षी एवढीच ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबईतील घराच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहतात. गतवर्षी ऑगस्टमध्ये म्हाडाने मुंबईतील 4082 घरांसाठी लॉटरी काढली होती. यात पंतप्रधान आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश होता. यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हाडातर्फे गोरेगाव, विक्रोळी, पवई, ताडदेव, जुहू येथील दोन हजार घरांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. गतवर्षीच्या लॉटरीतील शिल्लक घरांसह म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून मिळालेल्या घरांचाही लॉटरीत समावेश आहे. घराच्या किमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
…म्हणून किमतीत होणार वाढ
दरम्यान, शिल्लक घरांच्या वाढलेल्या किमतीबाबत म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाला विचारले असता, घराच्या बांधकामासाठी गुंतवलेल्या भाग भांडवलावरील व्याजामुळे गतवर्षीच्या लॉटरीच्या तुलनेत यंदाच्या लॉटरीत शिल्लक घरांच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
गोरेगावच्या पंतप्रधान आवास योजनेतील जवळपास 88 घरे शिल्लक आहेत. गतवर्षी या घराची पिंमत 30 लाख 44 हजार रुपये होती. आता या घरासाठी अंदाजे 34 लाख 70 हजार रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. उत्पन्नाची मर्यादादेखील आता तीन लाखांवरून सहा लाख रुपये केली आहे.
विक्रोळी कन्नमवार नगरमधील 34 लाख 74 हजार रुपयांच्या घरासाठी यंदा अंदाजे 35 लाख 82 हजार रुपये आकारले जाणार असल्याचे बोलले जातेय.
ताडदेवच्या क्रिसेंट टॉवर आणि जुहूच्या विक्रांत सोसायटीतील आलिशान घराच्या किमती म्हाडाने ‘जैसे थे’ ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्रिसेंट टॉवरमधील घरासाठी 7 कोटी 57 लाख आणि विक्रांत सोसायटीमधील घरासाठी 4 कोटी 87 लाख रुपये किंमत असणार आहे.