Ratnagiri News – दापोली-खेड तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यात भलेमोठे भगदाड, सर्व प्रकारची वाहतुक बंद

दापोली आणि खेड या दोन तालूक्यांसाठी वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा मार्ग असलेल्या रूखी, शेरवली, संगलट रस्त्यात मोठे भगदाड पडले. त्यामुळे या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक सुरक्षेच्या कारणामुळे बंद ठेवावी लागली. अचानकच घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

दापोली तालूक्यातील खेडकडे जाणा-या मार्गावर रूखी गावाच्या हद्दीतील रस्त्यात बुधवारी सकाळी 6 च्या सुमारास भले मोठे भगदाड पडल्याची घटना घडली. सदर प्रकार नागरिकांच्या निदर्शनात आला. त्यामुळे रूखीमार्गे शेरवली, संलटकडे जाणा-या एस.टी बसेसह खाजगी वाहनांची वाहतुक बंद ठेवावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले. रूखी, शेरवली आणि संगलट या मार्गावरील रस्त्याची सुधारणा व्हावी यासाठी रूखी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची वेळोवेळी भेट घेवून रस्ता सुधारण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. “रूखी, शेरवली, संगलट खेड मार्गाची सुधारणा वेळीच केली गेली असती, तर या मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली नसती. ही घटना पाहता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान रस्ता सुधारणा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. जर घेतला नाही, तर आपल्याला रस्ता सुधारण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून जन आंदोलन करावे लागेल. जन आंदोलना दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याच त्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील.” असा स्पष्ट इशारा रूखी ग्राम पंचायतीचे माजी सरपंच हिदायत देसाई यांनी प्रशासनाला दिला आहे.