विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास थोडाच कालावधी शिल्लक आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ही निवडणूक होण्याची दाट शक्यता असून महायुतीमध्ये आतापासूनच फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. जागावाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह समोर आला आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांनी दंड थोपटले आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याविरोधात जनतेत प्रचंड नाराजी आणि रोष आहे. त्यामुळे ते निवडून येणार नाही असे जनतेचे ठाम मत आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रआहे. जनतेच्या इच्छेला मानत देत आपण शिर्डीतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे विधान भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उमेदवार बदलला तरच जागा वाचेल. त्यामुळे शिर्डी मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे करणार आहे. या मतदारसंघात वर्षानुवर्ष सत्ताकेंद्र एकाच कुटुंबात असल्याने जनतेमध्ये नाराजी आहे. याआधीही आपण विखे यांच्याविरोधात निवडणूक लढली होती. 11 फेऱ्यांपर्यंत 13 हजार मतांनी आघाडीवरही होतो. पण थोडक्यात पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीत पक्षशिस्त पाळत निवडणूक लढलो नाही. मात्र आता येथून उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचेही पिपाडा म्हणाले.
जीवन आणि वैद्यकीय विम्यावरही GST, नितीन गडकरींची नाराजी; थेट अर्थमंत्र्यांना लिहिलं पत्र
शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे, असे म्हणत पिपाडा यांनी विखेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शिर्डी-नगर रस्ता 25 वर्षापासून प्रलंबित असून 55 वर्ष होऊनही निळवंडे कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळालेले नाही. साई संस्थानच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारे प्रकल्पही राबवले जात नाही. रोजगारी साधने नसल्याने तरुण बेरोजगार असून शेतीला पाणी नसल्याने शेतकऱ्यालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, असे पिपाडा म्हणाले.