
भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या जातीवाचक वक्तव्यावरून संताप व्यक्त होत आहे. तर अनुराग ठाकूर यांच्या वादग्रस्त विधानानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांचा व्हिडिओ शेअर करत कौतुक केले होते. यामुळे अनुराग ठाकूर यांना समर्थन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आता विरोधी पक्षाने विशेषाधिकार उल्लंघनाची तक्रार दाखल केली आहे. जालंधरचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी यासंदर्भात लोकसभा सरचिटणीसांकडे तक्रार केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन केले आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभेत अनुराग ठाकूर यांनी केलेल्या भाषणाचे मंगळवारी कौतुक केले होते आणि हे नक्कीच सर्वांनी ऐकायला हवे, असे म्हटले होते. मंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्याची जात विचारून खालची पातळी गाठली, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट शेअर केली. ‘हे भाषण जे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान नक्की ऐकण्यासारखे असे सांगत होते. यामध्ये त्यांच्या खासदाराने फार अपमानास्पद, असंवैधानिक आणि निंदनीय गोष्टी बोलल्या आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल करून पंतप्रधान मोदी यांनी संसदीय विशेषाधिकारांचे उल्लंघन केले आहे. विरोधकांनी निषेध केल्यानंतर सभापती जगदंबिका पाल यांनी भाषणातील तो भाग काढून टाकला जाईल, असे आश्वासन दिले होते. संसदेच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधून वगळलेल्या भाषणांचे उतारे संपादित करून अपलोड केले जातात. संसद टीव्हीने संपादित न केलेले भाषण अपलोड केले आणि नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी ते सार्वजनिकरित्या शेअर केले आणि त्याचे कौतुक केले’, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
यह भाषण जिसे नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्री ‘अवश्य सुनने’ वाला बता रहे हैं, इसमें इनके सांसद ने बेहद ही अपमानजनक, असंवैधानिक और निंदनीय बातें कही है। इसे शेयर करके प्रधानमंत्री ने संसदीय विशेषाधिकार के गंभीर उल्लंघन को बढ़ावा दिया है। पूर्व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर ने एक सांसद… https://t.co/tF75hK1sPd
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 31, 2024
हिंदुस्थानच्या संसदीय इतिहासातील ही नवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. यातून भाजप-आरएसएस आणि नरेंद्र मोदी यांचा खोलवर रुजलेला जातीयवाद दिसून येतो, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.