
लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षाने अयोध्येतील निर्माणाधीन राम मंदिराचा उद्घाटन सोहळा उरकून घेतला होता. राम मंदिराच्या नावाने मतांची झोळी भरण्याचा प्रयत्न भाजपचा होता. मात्र उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा फटका बसला. विशेष म्हणजे अयोध्येमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यात घाईगडबडीत उद्घाटन सोहळा झालेल्या राम मंदिरात पहिल्याच पावसाने गळती लागली होती. आता तर राम मंदिराचे बांधकामही रखडले आहे. हजारो कामगारांनी निर्माण कार्याला रामराम केल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी दिली.
मजुरांच्या कमतरेमुळे अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण कार्य रखडले आहे. गेल्या तीन महि्यांपासून निर्माण कार्य हळूहळू सुरू आहे. कारण निर्माण कार्यातील जवळपास 8 ते 9 हजार मजुरांपैकी निम्म्याहून अधिक मजूर काम सोडून गेले आहेत, अशी माहिती नृपेंद्र मिश्र यांनी दिली. या मंदिराचे काम करणाऱ्या ‘लार्सन अँड टर्बो’ कंपनीला त्यांनी मजूर वाढवण्याचे निर्देशही दिले आहेत. जेणेकरून डिसेंबर 2024 पर्यंत मंदिराचे काम पूर्ण होईल.
राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी ट्रस्टकडून जवळपास 100 ठेकेदार नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत हजारो मजूर निर्माण कार्यात सहभागी झाले. मात्र हजारो मजुरांनी काम सोडले असून पुन्हा परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी राम मंदिर उभारणीचे काम करणाऱ्या ‘एल अँड टी’ कंपनी आणि ठेकेदारांसोबत सोमवारी व मंगळवारी बैठक घेतली आणि मजूर वाढवण्याचे निर्देश दिले.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र म्हणाले की, सर्वात मोठे आव्हान शिखर उभारणीचे आहे. दुसऱ्या मजल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि दुसऱ्या मजल्यावरील घुमटांचे काम पूर्ण झाल्यानंतरच शिखराचे काम हाती घ्यावे लागेल. सध्याची गती पाहता राम मंदिर निर्माणकार्य जवळपास दोन ते तीन महिने उशिराने होईल असे दिसत आहे.
View this post on Instagram
त्यामुळे एल अँड टी कंपनीला मजुरांची संख्या वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आणखी 200 ते 250 मजूर निर्माण कार्यात सहभागी झाले नाहीत तर डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करणे कठीण आहे. सध्या हे काम नियोजित वेळेपेक्षा दोन महिने मागे असल्याचेही ते म्हणाले.