केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) अध्यक्षपदी 1983च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आणि माजी केंद्रीय आरोग्य सचिव प्रिती सूदन यांची वर्णी लागली आहे. प्रिती सूदन यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट 2024 ला त्या पदभार स्वीकारतील. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला स्वत: प्रिती सूदन यांनी ही माहिती दिली आहे.
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर प्रकरणानंतर मनोज सोनी यांनी तडाफडकी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी वैयक्तीक कारणांचा हवाला देत राजीनामा दिला होता. तेव्हापासून या पदावर कोणाची नेमणूक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर प्रिती सूदन यांच्याकडे यूपीएससी अध्यक्षपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.
1983 batch IAS officer Preeti Sudan will be the new UPSC Chairperson, with effect from 1st August 2024. pic.twitter.com/t6Ylfr4BOP
— ANI (@ANI) July 31, 2024
कोण आहेत प्रिती सूदन?
प्रिती सूदन या आंध्र प्रदेश कॅडरच्या 1983 बॅचच्या निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले. जुलै 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला होता. महिला व बालविकास मंत्रालयासह त्यांनी संरक्षण मंत्रालयातही काम केलेले आहे. यासह जागतिक बँकेच्या सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे.
पूजा खेडकर प्रकरणानंतर आली जाग; परीक्षा प्रक्रियेत यूपीएससी करणार मोठा बदल
प्रिती सूदन यांनी देशात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि आयुष्मान भारत’ हे दोन प्रमुख सरकारी कार्यक्रम सुरू करण्यासोबतच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, नॅशनल कमिशन फॉर अलायड अँड हेल्थकेअर प्रोफेशन्स आणि ई-सिगारेटवरील बंदीशी संबंधित कायदा बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
मनोज सोनी यांचा राजीनामा
मनोज सोनी यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले. मनोज सोनी हे 2017 साली यूपीएससीच्या घटनात्मक मंडळाचे सदस्य झाले. 16 मे 2023 रोजी त्यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडूनच नागरी सेवा परीक्षा घेण्यात येते. तसेच प्रशासकीय व्यवस्थेमधील आयएएस, आयपीएस आणि आयएफएस अशा उच्च अधिकाऱ्यांची निवड करण्याचे काम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून केले जाते. मनोज सोनी यांनी एक महिन्यापूर्वीच राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा सोपविला होता. यूपीएससीचे सदस्य होण्यापूर्वी मनोज सोनी यांनी गुजरातमधील दोन विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.