
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अरविंद वैश्य या तरुणाची धारावीत हत्या झाली होती. धारावी पोलिसांनी गुन्हा नोंद करून दोघांना अटकदेखील केली, मात्र याच प्रकरणावरून आज धारावीत काही नागरिकांनी जमाव करून घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.
अरविंद हा धारावीच्या राजीव गांधी नगरात राहत होता. रविवारी सायंकाळी एकाने अरविंदच्या भावाला पह्न केला. दुसऱयाचे भांडण असतानाही तिघे जण अरविंदला मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर शैलेंद्रकुमार याने अरविंदला फोन करून विचारणा केली. आपण भांडण सोडवण्यासाठी गेलो असता त्याने आपल्याला मारहाण केल्याने धारावी पोलीस ठाण्यात जात असल्याचे अरविंदने त्याच्या भावाला सांगितले.
रात्री साडेनऊ वाजता अरविंदचा भाऊ शैलेंद्र हा राजीव गांधी नगर येथे आला. तेथे दोघांनी त्यांना थांबवले तेव्हा त्याने घडल्या प्रकाराची माहिती दोघांना दिली. त्यानंतर शैलेंद्रने अरविंदला पुन्हा फोन केला. अरविंदने आपण पोलीस ठाण्यात असून पोलिसांना घेऊन राजीव गांधीनगर येथे येत असल्याचे सांगितले.
रात्री सवा दहाच्या सुमारास अरविंद मोटरसायकलवरून उतरून राजीव गांधीनगरच्या कचरा कुंडीजवळ जात असताना दोन जण आले. अल्लू नावाच्या एकाने अरविंदच्या छातीत चापू खुपसला. तेव्हा तेथे 5 जण उपस्थित होते. त्याला मारून टाका असे सांगताच पोलीस गाडीतून उतरले.
पोलिसांनी अल्लूला पकडले. जखमी अवस्थेत अरविंदला शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी अरविंदला मृत घोषित केले. याच घटनेवरून आज धारावीत जमाव जमल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.