मुंबई-हावडा मेलचे पाच डबे रुळावरून घसरून तिघांचा मृत्यू; 20 हून अधिक जण जखमी

एनडीए सरकारच्या दुर्लक्षामुळे रेल्वे अपघातांची मालिका अजूनही सुरूच असल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील जमशेदपूर येथे मंगळवारी पहाटे 3 वाजून 43 मिनिटांनी मुंबई-हावडा मेलचे पाच डबे रुळावरून घसरले. रुळावरून घसरलेले डबे शेजारच्या रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकले. त्यामुळे मालगाडीचे तब्बल 18 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 20हून अधिक जखमी झाले.

राजखरस्वान आणि बाडाबांबो दरम्यान हा अपघात झाला. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा प्रशासनाकडून तातडीची मदत देण्यात आली. त्याचबरोबर बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या, अशी माहिती चक्रधरपूर रेल्वे विभागाचे वरिष्ठ डीसीएम आदित्य कुमार चौधरी यांनी दिली. दरम्यान मालगाडीच्या डब्याला धडकल्यानंतर मुंबई हावडा मेलचे 5 डबे रुळावरून घसरले. या अपघातात 2 प्रवासी कोचमध्ये अडकले. एनडीआरएफने कोच कापून दोघांनाही बाहेर काढले. परंतु दोघांचाही मृत्यू झाला.

विरोधकांनी एनडीए सरकारला घेरले, रेल्वेमंत्र्यांवर विरोधकांचा हल्ला

एनडीए सरकारच्या दुर्लक्षामुळे आणखी एका अपघातात रेल्वे प्रवाशांना जीव गमवावा लागला. यावरून विरोधकांनी एनडीए सरकारला अक्षरशः घेरले. रेल्वे मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. रेल्वे अपघातांबाबत रेल्वे मंत्रालय उदासिन असून दर आठवडय़ाला होणाऱ्या रेल्वे अपघाताच्या घटना हेच शासन आहे का असा सवाल विरोधकांनी केला. ट्रेन दुर्घटनेचा सरकार विक्रम रचत असल्याचा उपरोधिक टोलाही लगावला.

दर आठवडय़ाला दुर्घटना हेच शासन आहे का?

देशात दर आठवडय़ाला रेल्वे दुर्घटना होत आहे. हेच एनडीए सरकारचे शासन आहे का? एनडीए सरकारची ही असंवेदनशीलता थांबणार कधी असा सवाल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्सवरून एनडीए सरकारवर निशाणा साधला.

सरकारला रेल्वे दुर्घटनांचा विक्रम रचायचा आहे

आज घडलेल्या रेल्वे अपघातावरून सरकारला रेल्वे दुर्घटनांचा विक्रम रचायचा आहे, असेच वाटते, असा टोला समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लगावला आहे. काही दिवसांपूर्वी पेपर लीकचा विक्रम सरकारने रचला. त्याचप्रमाणे रेल्वे दुर्घटनांचाही विक्रम सरकार रचू पाहत आहे. सरकारकडे इतके बजट आहे तरीही दुर्घटना का घडत आहेत, लोकांना सुविधा का मिळत नाहीत. आज ज्या रेल्वे प्रवाशांनी अपघातात जीव गमावला त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी करावे आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली आहे.

रेल्वेला नाही, रेल्वे मंत्र्यांना ‘सुरक्षा कवच’!

अपघातानंतर शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर एक्स पोस्टमधून तोफ डागली. ’रेल्वेचे माहीत नाही पण रेल्वेमंत्र्यांना मात्र नक्कीच ‘सुरक्षा कवच’ मिळालेले आहे. त्यांच्या कार्यकाळात रेल्वे अपघातांची मालिका थांबता थांबत नाही तरीही त्यांना हटवले जात नाही. दर आठवडय़ाला एक तरी अपघात होत असूनही त्यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्याऐवजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रेल्वेमंत्र्यांना प्रभारी बनवले आहे. त्यांनी आपल्या मंत्रालयावर लक्ष केंद्रीत करायला नको का?, असा खरमरीत सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.