मोदींकडे मोठी दैवी शक्ती आहे, त्यांनी आरक्षणावर सर्वमान्य तोडगा काढावा, आमचा पाठिंबा आहे! उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका

तुम्हाला एकमेकांत लढवून आपल्या राजकीय पोळय़ा भाजण्याचा प्रयत्न जे करत आहेत, मग तो भारतीय जनता पक्ष असो वा अन्य कुणी, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका.

आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही. बिहारने मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण न्यायालयाने उडवून लावले. त्यामुळे मर्यादा वाढवायची असेल तर तो प्रश्न लोकसभेतच सुटू शकतो. शिवसेनेचे खासदार सोबत राहतील. आरक्षणासाठी मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जावे. कारण ते नेहमी मागासवर्गीयांचा, लहानपणी त्यांनी केलेल्या संघर्षाचा दाखला देतात. त्यांच्याकडे मोठी दैवी शक्ती आहे. त्यामुळे मोदींनी आरक्षणासाठी सर्वमान्य तोडगा काढावा, शिवसेनेचा पाठिंबा आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडली.

मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरक्षणा संदर्भातील शिवसेनेची भूमिका रोखठोकपणे मांडली. तुम्हाला एकमेकांत लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा प्रयत्न जे करत आहेत, मग तो भारतीय जनता पक्ष असो वा अन्य कुणी, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आपण एका आईची लेकरे आहोत. महाराष्ट्राची  लेकरे आहोत. समाजासमाजात वितुष्ट, जातीपातीत भांडणे लावून महाराष्ट्राची विल्हेवाट कुणी लावत असतील तर त्यांचे स्वप्न राज्याला घातक आहे. ते यशस्वी होऊ देऊ नका, असे आपण मराठा समाजाच्या प्रतिनिधींना सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व समाजातील लोकांनी एकत्र या. त्यासाठी शिवसेना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासनही आपण दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना दुखवायचे नसेल. धनगर समजाला आरक्षण देताना आदिवासींना दुखवायचे नसेल. तर आधी कुणाला दुखवायचे की नाही हे मोदींनी, सत्ताधारी पक्षाने सांगायला हवे, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. सर्वांना न्याय मिळावा असे शिवसेनेचे प्रामाणिक मत आहे, तो न्याय त्यांना सध्याचे राज्यकर्ते असताना मिळेल असे वाटत नाही, लोकसभेतच मोदींनी निर्णय घ्यावा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मिंधे सरकारवरही निशाणा साधला.

इथे एकमेकांशी भांडत बसण्यापेक्षा मोदींकडे जाऊया. मोदींना सांगूया की तुम्ही लक्ष घाला. कारण लहानपणापासून त्यांनी संघर्ष केलेला आहे. त्या अनुभवातून मोदींनी तोडगा काढावा, अशी विनंतीही या वेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व समाजाच्या बांधवांना केली. सर्व समाजांना त्यांचे न्याय्य हक्क पाहिजे आहेत आणि न्याय्य हक्क मागणे हा गुन्हा नाही. पण आरक्षण द्यायचे तर त्याला कायद्याच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा ओलांडायच्या असतील तर ते केवळ लोकसभेत होऊ शकते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कुणी पाठिंबा देईल अशा अंधश्रद्धेत शिवसेना वावरत नाही

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनीही आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यासंदर्भात ते म्हणाले की, श्याम मानव यांच्या राज्यासाठी काही सामाजिक अपेक्षा आहेत, त्यासंदर्भात ते सर्वांना भेटत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाविकास आघाडीला पाठिंबा देईल, असे श्याम मानव म्हणाले होते. त्यासंदर्भातही माध्यमांनी या वेळी प्रश्न केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, अंधश्रद्धेपेक्षा जादूटोणाविरोधी समिती म्हणा. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक पुसटशी रेषा आहे आणि कोणी शिवसेनेला पाठिंबा देईल या अंधश्रद्धेत वावरणारे आम्ही नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

धारावीकरांना बेघर होऊ देणार नाही

धारावीकरांचे अन्यत्र पुनर्वसन करण्याचे विकासकाचे कारस्थान आहे. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांना शिवसेना अन्यत्र कुठेही जाऊ देणार नाही, धारावीमध्येच घर मिळायला पाहिजे ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे, असे बजावले. एका धारावीची वीस धारावी करायचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. धारावीकरांना उचलून मुलुंडला टाकायचे, मिठागरात टाकायचे, दहिसरला न्यायचे, कुर्ला डेअरीत टाकायचे असा विकासकाचा डाव शिवसेना उधळून लावेल, असा इशारा त्यांनी दिला. विकासकांच्या आणखी काही जागा असतील तर त्यांनी तिथे ट्रान्झिट कॅम्प बांधावेत, पण धारावीकरांना बेघर करून, मुंबईची विल्हेवाट लावण्याचे कोणत्याही विकासकाचे स्वप्न शिवसेना साकार होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

अशा घटनांकडे सरकारचे लक्षच नाही

उरणमधील घटनेच्या मुद्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारच्या राजवटीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले. अशा प्रकारच्या घटना राज्यात घडताहेत पण सरकारचे त्याकडे लक्षच नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तिकडे जाऊन आले. त्यांनी त्या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असेही त्यांनी सांगितले.

संन्यास घेतलेल्यांवर मी बोलत नाही

मुंबईतील प्रश्नावरून आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ‘मी संन्यास घेतलेल्या लोकांबद्दल बोलत नाही’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केली.

म्हणून गोरेगावचा भूखंड त्यांच्या घशात घालताहेत 

पशूसंवर्धन विभागाच्या मालकीचा गोरेगावमधील तीन एकरचा भूखंड मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी दिल्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला होता. त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी झाला. मात्र संध्याकाळी तो संकेतस्थळावरून हटवण्यात आला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मिंधे सरकारवर यावेळी जोरदार टीका केली. मुंबै बँकेवर सत्ताधाऱ्यांचे चेलेचपाटे बसलेले आहेत म्हणून तो भूखंड त्यांच्या घशात घालताय का? अशा शब्दात उद्धव ठाकरे राज्य सरकारवर कडाडले. भूखंड त्यांच्या घशात घालताय का? ही मुंबईकरांची जागा आहे. महाविकास आघाडीच्या सरकार दोन तीन महिन्यात येईल तोपर्यंत जर हा निर्णय रद्द झालेला नसेल तर आम्ही तो रद्द करूच. जे भूखंड ज्या कामासाठी ठेवले आहेत त्यासाठीच त्याचा उपयोग झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावले.

….त्याला खड्डा पुरुष पुरस्कार द्या

मुंबई-गोवा महामार्गांवरील खड्डय़ांचा मुद्दा यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मिश्किल शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले की, रस्त्याची कंत्राटे आणि त्याची हमी दिली होती त्यांना पुरस्कार जाहीर करा. ज्यांनी सांगितले की 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत त्याला युगपुरूषसारखा खड्डापुरूष पुरस्कार द्यायला हवा. हिंदीमध्ये त्याला आपण काय म्हणणार…गढ्ढा पुरूष. नड्डा नाही हा, गढ्ढा बोलतोय, असे उद्धव ठाकरे म्हणताच पत्रकार परिषदेत हशा पिकला.

मराठा आंदोलकांत भाजप कार्यकर्त्यांची घुसखोरी

कलानगर येथे मराठा आंदोलक पोहचले असता भाजपचे काही कार्यकर्ते या आंदोलकांमध्ये घुसले. त्यापैकी कल्याण-डोंबिवलीतील भाजपचा पदाधिकारी सुशील पायाळ याला यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता त्याने तोंड लपवून पळ काढला. भाजपचे हे छुपे कारस्थान माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

मिंध्यांनी अडीच वर्षांत तोडगा का काढला नाही?

मिंध्यांनी गद्दारी करून आमचे सरकार पाडले त्याला अडीच वर्षे झाली. मग अडीच वर्षांत आरक्षणावर तोडगा का काढला नाही? कोणी अडवले होते? असा सवाल करत विधानसभेत मिंधे सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठराव आणला तेव्हा शिवसेनेने पाठिंबा दिला होता याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांबद्दल या वेळी उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘अनिल देशमुख यांनी मला सगळे प्रकरण सांगितले होते. सत्तेवर बसलेले सगळे अमानुष आहेत. कुटुंब बघत नाहीत, मुलाबाळांवर घाणेरडे आरोप करून त्यांचे आयुष्य बरबाद करत आहेत. त्यांनाही मुले आहेत हे त्यांना कळत नाही. उद्या त्यांच्या मुलाबाळांवर आरोप केले तर कळेल आईवडिलांचे दुःख काय असते. पूर्वीचा भाजप वेगळा होता, आताचा भाजप अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणारा आहे, ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

वेशांतर करून देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारा गृहमंत्री नकोच!

राज्याच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वेश बदलून फिरत होते, असे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले होते. उद्धव ठाकरे त्यावर बोलले. गृहमंत्रीच नाव बदलून, दुसऱ्यांना टोप्या घालून जात असतील तर भयंकर बाब आहे. विमानतळाची सुरक्षा बोगस आहे हेच संजय राऊत यांनी बाहेर काढले आहे. साध्या  माणसांना सुरक्षेच्या नावाखाली छळले जाते. पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा माजी विरोधी पक्षनेता वेशांतर करुन देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना हे मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सरकार पाडण्यासाठी, पक्ष फोडण्यासाठी जो गृहमंत्री सुरक्षाव्यवस्थेशी खेळ करतो आहे तो जागेवर राहताच कामा नये, या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी शरसंधान केले. जो गृहमंत्री आपले अधिकार पक्षाच्या हितासाठी वापरतो आहे तो गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहण्यास लायक नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रमेश केरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब उपस्थित होते.