रेसकोर्सवर बांधकाम न करता ‘मुंबई सेंट्रल पार्क’ उभारणार; आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम न करता अद्ययावत सुविधा असणारे भव्य सेंट्रल पार्क तयार करणार आहे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आल्यामुळे आता सेंट्रल पार्कचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यामध्ये रेसकोर्सची 120 एकर आणि कोस्टल रोडची सुमारे 180 एकर जागा मिळून एकूण 300 एकर जागेवर संपूर्ण हिरवळीसह चालण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा आदी सुविधा तयार करण्यात येतील. रेसकोर्सवर कोणतेही बांधकाम करू नये, अशी ठाम भूमिका घेत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच रेसकोर्स क्लबकडून 120 एकर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू असल्याचे जाहीर करीत आदित्य ठाकरे यांनी नुकताच हा घोटाळा उघड केला होता. मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या काही सदस्यांना धमकावून, दबाव आणून महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्यासाठी हा घोटाळा सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उघड केल्याने सरकार हादरले होते, तर आता पालिका प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई सेंट्रल पार्क उभारणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

रेसकोर्सवरून जमिनीखालून थेट कोस्टल रोड उद्यानात

पालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पात तब्बल 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणीदेखील उद्यानासाठी अद्ययावत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

हे उद्यान डॉ. अॅनी बेझंट रोड येथून 25 मीटर रुंदीचा अंडरग्राऊंड मार्ग तयार करण्यात येणार आहे. हा मार्ग केवळ नागरिकांना ये-जा करण्यासाठी असेल, वाहनांसाठी नसेल.

त्यामुळे रेसकोर्सवरील 120 एकरचे ‘मुंबई सेंट्रल पार्क’ आणि कोस्टल रोडवरील 175 एकर जागेवरील उद्यान जोडल्यावर एकूण 300 एकरचे ग्राऊंड मिळणार आहे.