रेल्वे अपघात लाजिरवाणे, रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतलेत; इंडिया आघाडीचा सत्ताधारी NDA वर हल्लाबोल

झारखंडच्या सरायकेला-खरसावा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी मुंबई-हावडा मेलचा अपघात झाला. या अपघातात 18 डबे रुळावरून घसरले, त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. सातत्याने होणाऱ्या रेल्वे अपघातांवरून इंडिया आघाडीने एनडीए सरकारला धारेवर धरले. 2014 पासून मोदी सरकारच्या काळात झालेल्या अपघातांचा उल्लेख करत काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला. प्रत्येत आठवड्यात रेल्वे अपघात होत आहेत, हेच सरकारचे व्यवस्थापन आहे काय, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनाही सरकारवर तोफ डागली. रेल्वे अपघात सातत्याने होत आहेत. हे लाजिरवाणे आहे. रेल्वे अपघातांवर कारवाई होत नाही. त्याची जबाबदारी कोणाही घेत नाही. रेल्वेमंत्री फक्त प्रचारात गुंतले आहेत, अशी टीका चतुर्वेदी यांनी केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, रेल्वे अपघात आता दर आठवड्यात होत आहेत. मंगळवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. झारखंडमध्ये हावडा-मुंबई मेल रुळावरून घसरली. यात दोन जणाचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. हे खूप दुःखद आहे. असे अपघात हेच सरकारचे व्यवस्थापन आहे काय, असा संतप्त सवालही बॅनर्जी यांनी केला.

रेल्वे अपघात आणि प्रवाशांच्या मृत्यूची मालिका किती दिवस सुरू राहणार? हे आम्ही किती दिवस सहन करणार? केंद्र सरकारच्या असंवेदनशीलतेला अंत होणार का? समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव य़ांनीही एनडीएवर हल्लाबोल केला. सरकारला प्रत्येक क्षेत्रात रेकॉर्ड बनवायचे आहे. सध्या पेपरफुटीचे रेकॉर्ड सुरू होते. आता रेल्वे अपघातांचे रेकॉर्ड तयार केले जात आहे. एवढे मोठे सुरक्षा बजेट असतानाही इतके रेल्वे अपघात का होत आहेत? असा सवालही यादव यांनी केला आहे.