राज्यात सध्या कुठेही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू नसताना मुंबईत ‘मातोश्री’समोर अचानक आंदोलन कसे काय सुरू झाले? असा सवाल करत मनोज जरांगे पाटील यांनी हा मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा डाव असल्याचा आरोप केला. हे अभियान दरेकरांचे असावे, असेही जरांगे म्हणाले.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी मुंबईत ‘मातोश्री’बाहेर मराठा आंदोलकांनी केलेल्या आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणावर सध्या राज्यात कुठेही आंदोलन सुरू नाही. मग अचानक मुंबईत आंदोलन कसे काय सुरू झाले, असा सवाल जरांगे यांनी केला. मराठा आंदोलनाला चोहोबाजूने बदनाम करण्याचे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचे कारस्थान आहे. मराठा आंदोलकांना सत्ताधारी तसेच विरोधकांना आपल्या मागण्यांबद्दल विचारण्याचा हक्क आहे. पण भेटणारांनी, आंदोलन करणारांनी आपण कुणाच्या अभियानाचे भाग असू नये याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
विधानसभेत मराठा आवाज घुमणार
आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी भांडणारी माणसे विधानसभेत हवीत, त्यामुळे मराठा समाजाने आपली माणसे निवडून आणण्यासाठी तयारीला लागावे, असे मनोज जरांगे म्हणाले. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीत राज्यातील मतदारसंघनिहाय चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्यावर निर्णय होईल. आम्ही ठरवू त्या उमेदवाराला मराठा समाजाने निवडून द्यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.