लातुरात वस्तीगृहात राहणार्‍या मुलाचा संशयास्पद मृत्यू, दोघांवर गुन्हा दाखल

स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ हॉस्टेल येथे राहणार्‍या इयत्ता 7 वी मध्ये शिकत असलेल्या मुलाचा मृत्यू झाला. मयत मुलाच्या मृत्यू प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहदेव गणपती तरकसे (45)यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या साडूचा मुलगा अरविन राजेभाऊ खोपे (13) हा लातूर येथील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ हॉस्टेल एमआयडीसी येथे राहत होता. स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय (सीबीएससी) शाळेत इयत्ता 7 वी वर्गात शिकत होता. सोमवार, दि.29 जुलै रोजी फिर्यादीचा मुलगा सुरज याने अरविन खोपे यास शाळेत नेवून सोडले होते. मुलाच्या आईने फोन करून कळवले. अरविनची वर्ग शिक्षिक हिने फोनवरून त्यांना कळविले की, अरविन यास अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेल्या ठिकाणाहून पोटातून रक्त निघत आहे व त्यामुळे त्यास दवाखान्यात पाठवले आहे. परंतु, तेथे डॉक्टर उपलब्ध नाहीत. नंतर तो पळून गेला आहे, असे सांगितले गेले.

अरविन याचा लातूर शहरात बसस्थानक, रेल्वे स्टेशन, नाना-नानी पार्क, परळी, अंबेजोगाई असा सर्व ठिकाणी शोध घेतला, पण तो सापडला नाही. नंतर रात्री त्याने हॉस्टेल मध्ये फाशी घेतली, असे सांगितले गेले. त्याचा मृतदेह कार्यालयात आढळून आला. त्याच्या मरणास हॉस्टेलचे टेकाळे व सूर्यवंशी हे जबाबदार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.