मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक आणि शिक्षणमहर्षी नामदार नाना (जगन्नाथ) शंकरशेट यांचे भव्य तैलचित्र एलफिन्स्टन महाविद्यालयात लागणार आहे. नानांच्या 159 व्या पुण्यतिथी दिनी बुधवारी 31 जुलै रोजी भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.
मुंबईतील पहिले एलफिन्स्टन महाविद्यालय 1836 मध्ये स्थापन करण्यात नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याच पुढाकाराने गव्हर्नर एलफिन्स्टन यांच्या नावाने पहिले उच्च शिक्षण महाविद्यालय मुंबईत सुरू झाले. नानांचे तैलचित्र या महाविद्यालयात लावण्यात यावे यासाठी नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर यांनी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून नाना शंकरशेट यांच्या स्मृती विद्यार्थ्यांच्या चिरंतन स्मरणात राहाव्यात यासाठी त्यांच्या 159 व्या पुण्यतिथी दिनी 31 जुलै रोजी नानांच्या भव्य तैलचित्राचे अनावरण महाविद्यालयातील लायब्ररीत दुपारी 1 वाजता डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या हस्ते होणार आहे.
कुलसचिव विलास पाध्ये, वित्त व लेखा अधिकारी माधव नागरगोजे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक विजया येवले, नवोपक्रम व नवसंशोधनाचे संचालक डॉ. विशाल बाणेवार, एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुमित्रा सावंत, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सुविधा सरवणकर, न्यायसहाय्य विज्ञान संस्थेच्या संचालक प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.