फडणवीसांचे पाकीट घेऊन समित कदम आला होता, अनिल देशमुख भिडले… पुरावेच समोर ठेवले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते-आमदार आदित्य ठाकरे यांना खोट्या केसेसमध्ये अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्रस्ताव घेऊन समित कदम नावाची व्यक्ती आपल्याकडे आली होती, असा नवा गौप्यस्फोट माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज केला. समित कदम आणि फडणवीसांच्या संबंधांचे पुरावेच त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर ठेवल्याने फडणवीसांबरोबरच भारतीय जनता पक्षाचेही धाबे दणाणले आहे.

अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. समित कदम हा सांगलीतील मिरजचा आहे. तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी पाच ते सहा वेळा त्याला माझ्याकडे सीलबंद पाकीट घेऊन पाठवले होते. माझ्याविरुद्धची ईडीची कारवाई थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांसह अनेक नेत्यांवर मी प्रतिज्ञापत्राद्वारे खोटे आरोप करायचे, असे समित कदमने सांगितले होते, अशी माहिती या वेळी अनिल देशमुख यांनी दिली.

समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध काय? याची सर्व माहितीही देशमुख यांनी या वेळी पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, “समित कदम हा सांगलीतील मिरजचा आहे. फडणवीसांबरोबर त्याचे अतिशय जवळचे संबंध आहेत. त्याने अनेकदा त्यांची भेट घेतली आहे. दोघांचे एकत्रित पह्टोही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. अनिल देशमुख यांनी ते पह्टोही या वेळी माध्यमांना दाखवले. मिरज, सांगली या भागात चौकशी केली तर कोणीही या दोघांबद्दल सांगेल,’’ असे ते म्हणाले.

समित कदमची पत्नी फडणवीसांना राखी बांधते

समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत असे यावेळी अनिल देशमुख म्हणाले. समित कदम याने अनेकदा फडणवीस यांची भेट घेतली आहे. समितची पत्नी फडणवीस यांना राखी बांधते इतके त्यांचे घरगुती संबंध आहेत. त्याचीही छायाचित्रे उपलब्ध असल्याचे देशमुख यांनी सांगितले.