भाजप आमदाराचा प्रताप! ‘लाडकी बहीण’च्या होर्डिंग्जवर परवानगीशिवाय फोटो लावला

मिंधे सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना गरीब महिलांचे संसार उद्ध्वस्त करायला उठली आहे. या योजनेच्या होर्डिंग्जवर पुण्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दोन महिलांचे फोटो परवानगीशिवाय लावले. त्यातील एका महिलेचा पती शहरभर लागलेले ते होर्डिंग्ज पाहून इतका संतापला की तिला घटस्फोट द्यायला उठला आहे. त्या महिलेने आमदार शिरोळे याच्याविरुद्ध पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.

भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी आमदार शिरोळे यांचे हे कारस्थान उघड पाडले. पुणे येथील छत्रपती शिवाजी नगरमध्ये शिरोळे यांनी लावलेल्या होर्डिंग्जवर नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांचे फोटो आहेत. त्या होर्डिंग्जसमोरच गंगावणे यांनी त्या दोन्ही महिलांच्या उपस्थितीत फेसबुक लाइव्ह केले.

होर्डिंग्जवर दिसणाऱ्या दोन्ही महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्जही केले नाहीत. आमदार शिरोळे यांनी फोटो लावण्यापूर्वी त्यांची परवानगीही घेतलेली नाही. तरीसुद्धा शिवाजी नगर परिसरात नाक्यानाक्यांवर शिरोळे यांनी होर्डिंग्ज लावले आहेत. ही चक्क फसवणूक असल्याचे गंगावणे म्हणाले. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिडी लावून त्या होर्डिंग्जवरील संबंधित महिलांचे फोटो कट करून शिरोळे आणि मिंधे सरकारचा निषेध नोंदवला.

मिंधे, भाजपच्या फसव्या योजनांच्या जाहिरातींवर बेपत्ता, मृतांचेही फोटो

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या पंतप्रधान आवास, उज्ज्वला गॅस योजनेच्या जाहिरातींवर लावण्यात आलेल्या फोटोतील व्यक्तींना त्या योजनांचा लाभ मिळालाच नव्हता. तसाच प्रकार मिंधे सरकारच्या बाबतीतही घडत आहे. मिंधे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या तीर्थदर्शन योजनेच्या होर्डिंग्जवर गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा फोटो लावला होता. तो फोटो पाहून त्याचा मुलगाही आश्चर्यचकीत झाला होता आणि त्याने आता माझ्या वडिलांना शोधून आणा, अशी मागणी सरकारकडे केली होती. अशा तक्रारी येऊ नयेत म्हणून काही भागांमधील होर्डिंग्जवर मृत व्यक्तींचेही फोटो लावले गेल्याची चर्चा आहे.

फेसबुक पोस्ट डिलिट करण्यासाठी पोलिसांचा दबाव

नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांनी यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांकडे आमदार शिरोळे यांच्याविरोधात लेखी तक्रार केली. दरम्यान, गंगावणे यांना या प्रकारानंतर शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. आमदार शिरोळे यांच्या दबावाखातर ती अटक झाल्याचे समजते. त्यानंतर पोलिसांनी गंगावणे यांना फेसबुक पोस्ट तातडीने डिलिट करण्यासाठी दबाव आणला. अन्यथा गुन्हा नोंदवू, असा दमही भरल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजले.