
लोणावळा शहर व परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांचे होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. लोणावळा पोलिसांनी मागील आठवडय़ात धोकादायक पर्यटन करणाऱ्या तब्बल 48 जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र, तरीही पोलीस प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत काही ठिकाणी पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच आहे.
वारंवार सूचना देऊनही धोकादायक पर्यटनाच्या प्रमाणात घट होताना दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (28 रोजी) लोणावळा शहर पोलिसांनी 26 पर्यटकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
भुशी धरणामागील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने पुण्यातील एकाच कुटुंबातील पाचजणांचा बळी गेला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्गम ठिकाणी, डोंगर-दऱ्यांवर, खोल पाण्यात, तसेच प्रतिबंधित ठिकाणी पर्यटनास मनाई आदेश काढले होते. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता भुशी डॅम, गड-किल्ले परिसर, टायगर, लायन्स पॉइंट्स, घुबड तलाव, सहारा पूल धबधबा या ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेले पर्यटक मुंबई, मावळ, मुळशी, शिक्रापूर, शिरूर, चाकण, खेड, पुणे शहर परिसरातील आहेत. याबाबत पोलीस नाईक हनुमंत शिंदे आणि रईस मुलाणी यांनी स्वतंत्र फिर्यादी दाखल केल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुहास जगताप तपास करीत आहेत.